
शेतकरी आत्महत्या, सिंहस्थ कुंभमेळा यासह विविध प्रश्नांवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बुधवारी राज्यातील ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांशी चर्चा केली. यामुळे कुंभमेळा विकासकामांतील भ्रष्टाचाराचा मुद्दा आता राष्ट्रीय स्तरावर गाजणार आहे.
नाशिकच्या गंगापूर धरणाजवळील एमटीडीसी रिसॉर्टवर दहा दिवसांपासून राज्यातील काँग्रेसच्या सर्व जिल्हाध्यक्षांचे निवासी प्रशिक्षण शिबीर सुरू आहे. बुधवारी समारोपासाठी सकाळी साडेअकरा वाजता राहुल गांधी यांचे शिबिरस्थळी आगमन झाले. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, माणिकराव ठाकरे यांच्यासह काँग्रेस नेत्यांशी त्यांनी अर्धा तास चर्चा केली. नाशिक-त्र्यंबकेश्वरच्या कुंभमेळ्यानिमित्त सुरू असलेली विकासकामे, त्यात होत असलेला भ्रष्टाचार, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, एक लाख कोटींचा शक्तिपीठ महामार्ग या विषयांची त्यांनी माहिती घेतली. राज्यातील विविध विषय आणि प्रश्न त्यांनी सर्वांकडून जाणून घेतले. कुंभमेळा कामातील भ्रष्टाचाराविरुद्ध केंद्रात आवाज उठविणार असल्याचे राहुल गांधी यांनी सांगितल्याचे पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.
“कुंभमेळ्याचे बजेट नाही, प्रोजेक्ट रिपोर्ट नाही, ठराविक ठेकेदारांना कामे देऊन चाळीस-चाळीस टक्के कमिशन लाटले जात आहे. एक लाख कोटींचा शक्तिपीठ महामार्ग कशासाठी? यासह विविध प्रकरणांमधील भ्रष्टाचार हे आगामी निवडणुकीतील प्रचाराचे मुद्दे असतील,” असे चव्हाण यांनी सांगितले. “आतापर्यंत दीडशे परीक्षांचे पेपर फुटले, मात्र अद्याप कोणालाही शिक्षा झालेली नाही. पेपरफुटीला भाजपचे वरिष्ठ जबाबदार आहेत,” असेही ते म्हणाले.
नाशिकमध्ये आंदोलन करणाऱ्या आदिवासी विद्यार्थी संघटनेच्या प्रतिनिधींमध्ये राहुल पावरा, सागर पावरा, प्रशांत गावंडे, सचिन पावरा, अरुण पावरा, विवेक गावित, लक्ष्मी जाधव, धनुश्री पराडके, नीलम कुवर, सोनीराम गायकवाड, वैष्णवी किल्लर यांचा शिष्टमंडळात समावेश होता.
आदिवासी विद्यार्थ्यांशी राहुल गांधींची चर्चा
काँग्रेस जिल्हाध्यक्षांच्या प्रशिक्षण शिबिरस्थळी नागपूर, पुणे, नाशिकसह राज्यातील आदिवासी विद्यार्थी संघटनांच्या प्रतिनिधींनी राहुल गांधी यांची भेट घेऊन आपल्या समस्या मांडल्या. “आदिवासी विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी काँग्रेस पाठीशी आहे,” अशी ग्वाही राहुल गांधी यांनी दिली.
जिल्हाध्यक्षांच्या कुटुंबीयांची भेट
सर्व जिल्हाध्यक्षांच्या कुटुंबीयांची राहुल गांधी यांनी भेट घेऊन आपुलकीने विचारपूस केली. “राहुल गांधी हेच देशाची प्रगती करू शकतील,” असा विश्वास यवतमाळचे जिल्हाध्यक्ष अॅड. सचिन नाईक यांच्या पत्नी सारिका नाईक व मुलगी शर्मिष्ठा नाईक यांनी व्यक्त केला.
आरएसएस महिलेला सरसंघचालक करणार का?
“महिला आरक्षणाला काँग्रेस विरोध करत असल्याचा भाजपचा आरोप खोटा आहे. सन २०२३ मध्ये महिला आरक्षण घटना दुरुस्तीला काँग्रेसनेच मदत केली, या आरक्षणाचे जनकच आम्ही आहोत. भाजपला देशवासीयांची दिशाभूल करायची आहे, उत्तर-दक्षिण वाद निर्माण करायचा आहे. आरएसएसमध्ये महिला येऊ शकतात का? महिला सरसंघचालक होऊ शकतात का? हे आरएसएसने सांगावे,” असे आव्हान पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपला दिले.




























































