
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो भिंतीवरून काढला म्हणून मनसेचे नेते अमित ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. पण माझ्या भावाचा विमान कोसळून मृत्यू होऊनही साधा एफआयआरदेखील का दाखल केला नाही, असा संतप्त सवाल करीत खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारला आज फटकारले. या अपघाताची चौकशी करण्याबाबतही आमदार, खासदारही मौन का बाळगून आहेत, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
ठाण्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सुप्रिया सुळे यांना पत्रकारांनी अमित ठाकरे यांच्यावर दाखल झालेल्या गुह्याबाबत प्रतिक्रिया विचारली. त्यावेळी संतप्त होत त्या म्हणाल्या, पंतप्रधानांचा एक फोटो काढला म्हणून तुम्ही एफआयआर दाखल करता. पण अजितदादा याच सरकारमध्ये उपमुख्यमंत्री होते. त्यांच्या पक्षाचे सुमारे 40 आमदार आणि आठ-नऊ मंत्री सत्तेत आहेत. मात्र, माझ्या भावाच्या एफआयआरबाबत किंवा चौकशीबाबत त्यापैकी एकानेही आवाज उठवला नाही, असे सांगून सुळे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
ठाण्यातील रिंग रुट, अॅमेझॉन डेटा सेंटरला विरोध
कोणाचीही मागणी नसताना ठाणे शहरात रिंगरुट प्रकल्प उभारला जात आहे. मात्र या प्रकल्पाला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा विरोध असल्याचे सुप्रिया सुळे यांनी सांगितले. ठाण्यात अॅमेझॉन डेटा सेंटरही उभारू देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.




























































