
‘गंमत जंमत’, ‘हमाल दे धमाल’, ‘नवरी मिळे नवऱयाला’ यांसारख्या अनेक दर्जेदार चित्रपटांतून ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगावकर यांनी आपल्या अभिनयाचे अनोखे रंग भरले. चाळीसहून अधिक वर्षे त्यांनी रुपेरी पडदा गाजवला. अजूनही त्यांचा अभिनय तेवढाच ‘तरुण’ आहे. प्रदीर्घ कारकीर्दीचा आढावा घेणारी चित्रमय झलक अनुभवण्याची संधी वर्षा उसगावकर यांच्या चाहत्यांना मिळाली आहे. निमित्त आहे त्यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या ‘वर्षारंग’ या अनोख्या ‘कॉफी टेबल’ बुकचे. या चित्रमय पुस्तकाचे चाहत्यांनी स्वागत केले आहे. ‘वर्षारंग’ या कॉफी टेबल बुकमध्ये एकूण 86 रंगीत चित्रे आहेत. त्याद्वारे वर्षा उसगावकर यांचे प्रसन्न व्यक्तिमत्त्व, अष्टपैलू गुणवत्ता, सौंदर्य, नृत्य आणि सकारात्मक दृष्टिकोन याचे दर्शन होते. एकूण 72 पृष्ठसंख्या असलेल्या या संग्राह्य कॉफी टेबल बुकची निर्मिती पुणे येथील मुकुल मारणे यांच्या नीलपंठ प्रकाशन या संस्थेने केली आहे. बुकचे मूल्य सहाशे रुपये असून अभिनेता उदय टिकेकर यांची प्रस्तावना आहे. तर या पुस्तकाची संकल्पना आणि निर्मिती सुनील महाजन, निकिता मोघे यांची आहे. लेखन चित्रपट विश्लेषक दिलीप ठाकूर यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क ः 96898 25751 / 94211 78804.



























































