
आश्रमशाळेतील मुलींवर होणारा अन्याय तसेच विनयभंगाच्या घटना यामुळे अनेक विद्यार्थिनींमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होते. या मुलींची सुरक्षितता लक्षात घेऊन कोठारे आश्रमशाळेतील विद्यार्थिनींना गुडटच-बॅडटचचे धडे देण्यात आले. तसेच एखादी घटना घडल्यास प्रतिबंध कसा करायचा याचेही मार्गदर्शन तज्ज्ञांमार्फत देण्यात आले.
मुंबईतील सेवा सहयोग फाऊंडेशनच्या वतीने वर्षा चंदे यांनी गुडटच-बॅडटच या विषयावर विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. चांगला व चुकीचा स्पर्श यातील फरक कसा ओळखायचा, स्वतःची सुरक्षा कशी करायची याच्याही काही टिप्स दिल्या. अनोळखी व्यक्तीकडून चुकीचे वर्तन झाल्यास अडचणीच्या प्रसंगी कुठे संपर्क करायचा याचीदेखील माहिती मुलींना दिली.
कायदेशीर बाबींची दिली माहिती
किन्हवली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन खैरनार यांनी बालकांवरील लैंगिक अत्याचार प्रतिबंध, त्यासंदर्भातील कायदेशीर तरतुदी तसेच डायल ११२ या आपत्कालीन पोलीस मदत क्रमांकाबाबत विद्यार्थिनींना माहिती दिली. कविता फर्डे यांनी किशोरवयात होणारे शारीरिक व मानसिक बदल, भावनिक | समस्या, दैनंदिन जीवनातील अडचणी आणि त्यावर योग्य पद्धतीने मात कशी करायची, याबद्दल मार्गदर्शन केले.

























































