
बॉलीवूडच्या झगमगाटापासून दूर जात अभिनेता वरुण धवनने चक्क शेतात उतरून शेतीचा अनुभव घेतला आहे. वरुणने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले असून, त्यामध्ये तो भाताची लागवड करताना तसेच फावड्याने शेतातील काम करताना दिसत आहे. या फोटोंसोबत त्याने अगदी मोजक्या शब्दांत ‘शेती सुरू’ असे कॅप्शन दिले आहे. वरुणच्या या पोस्टनंतर त्याच्या चाहत्यांनी आणि कलाकार मित्रांनी त्यावर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. अभिनेत्री भूमी पेडणेकरने वरुणच्या या अंदाजाचे कौतुक करत ‘सर्वोत्तम आयुष्य’अशी प्रतिक्रिया दिली. वरुणचा शेतातील साधा आणि वेगळा अंदाज चाहत्यांनाही पसंत पडत आहे.
View this post on Instagram
गेल्या काही दिवसांपूर्वी वरुणने स्वतःची शेती खरेदी केली असून, त्याने चाहत्यांसोबत सोशल मीडियावर शेअर केली. विशेष म्हणजे, या मोठ्या यशाचा आनंद त्याने कोणत्याही भव्य सेलिब्रेशनने नव्हे, तर आपल्या नव्या फार्मवर निवांतपणे चहा आणि बिस्किटे खात साजरा केला होता. वरुणने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला होता. त्यामध्ये तो आपल्या नव्या फार्मवर निवांत बसलेला दिसत होता. वरुणसाठी ही जागा केवळ मालमत्ता किंवा गुंतवणूक नसून भावनिकदृष्ट्याही महत्त्वाचा असल्याचे त्याच्या पोस्टवरून जाणवले होते.
वरुणने ही शेती कुठे घेतली आहे याबाबत मात्र कोणतीही माहिती दिली नाही. दरम्यान, वरुण धवन आणि त्याची पत्नी नताशा दलाल हे मुंबईतील जुहू परिसरातील आलिशान मालमत्तांच्या खरेदीमुळेही चर्चेत आहेत. वृत्तानुसार, या दोघांनी सुमारे 44.52 कोटी रुपयांचा आलिशान फ्लॅट खरेदी केला आहे. याशिवाय वरुण आणि त्याची आई करुणा धवन यांनी त्याच प्रकल्पात सुमारे 42.40 कोटी रुपयांची आणखी एक मालमत्ता खरेदी केल्याचे सांगितले जाते. दोन्ही व्यवहारांची एकूण किंमत सुमारे 86.92 कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे.


























































