
वाराणसीहून दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडिया एक्सप्रेसच्या विमानाचे स्मोक अलार्म मिळाल्याने लखनौमध्ये आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. विमानातील कार्गो होल्डमध्ये स्मोक अलार्म वाजल्याने विमान लखनौला वळवण्याचा निर्णय घेण्यात आला. लखनौ विमानतळावर उतरल्यानंतर विमानाची तपासणी करण्यात आली. या तपासणीत विमानात धूर किंवा आगीचे कोणतेही चिन्ह दिसले नाही.
एअर इंडिया एक्सप्रेसचे IX 1253 या विमानाने गुरुवारी सकाळी 8 वाजता वाराणसीहून दिल्लीसाठी उड्डाण केले. विमानात 155 प्रवासी आणि कर्मचारी होते. उड्डाणानंतर काही वेळातच कार्गो होल्डमधील धुराचा इशारा देणारी यंत्रणा कार्यान्वित झाली. त्यानंतर वैमानिकाने लखनौ एअर ट्रॅफिक कंट्रोलशी (ATC) संपर्क साधून विमान उतरवण्याची परवानगी मागितली.
हे विमान सकाळी 8.52 वाजता लखनौ विमानतळावर उतरले. त्यानंतर विमानतळावरील आपत्कालीन प्रतिसाद टीम, अग्निशमन दलाचे जवान आणि तांत्रिक तज्ज्ञांनी विमानाच तपासणी केली. सकाळी 9.02 वाजता सर्व प्रवाशांना सुरक्षित विमानातून उतरवण्यात आले. त्यानंतर तपासणीसाठी विमान हँगरमध्ये हलवण्यात आले.
प्राथमिक तपासणीत विमानात धूर किंवा आगीचे कोणतेही चिन्ह आढळले नाही, असे सूत्रांनी सांगितले. तसेच, धुराचा इशारा देणारी यंत्रणा नेमकी कशामुळे कार्यान्वित झाली, याचे कारण शोधण्यासाठी तपास सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.



























































