
डोणगाव येथील लक्ष्मी नगर परिसरात राहणार्या दोन जिवलग मित्रांचा भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याने संपूर्ण डोणगाव शहरावर शोककळा पसरली आहे. शेख साहिल शेख जफर आणि शेख शाकिब शेख शकील कुरेशी या दोघांचा 2 सप्टेंबर रोजी रात्री झालेल्या अपघातात गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला. 3 सप्टेंबर रोजी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास दोन्ही मित्रांची अंत्ययात्रा एकाच वेळी काढण्यात आली. यावेळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. त्यानंतर दोघांचाही दफनविधी जवळजवळ एकाच वेळी करण्यात आला.
डोणगावजवळील मुंबई-नागपूर राज्य महामार्गावर 2 सप्टेंबर रोजी रात्री सुमारे 7.45 वाजता हा भीषण अपघात झाला. शेख साहिल आणि शेख शाकिब हे दोघे मित्र मोटारसायकलवरून मेहकरकडे जात होते. नागापूरसमोरील पुलाजवळ ते काही कारणाने थांबले असताना मेहकरकडून येणार्या कंटेनरने त्यांच्या मोटारसायकलला जोरदार धडक दिली. धडक एवढी भीषण होती की, दोन्ही मित्र रस्त्याच्या खाली जाऊन पडले. त्यात ते गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच मेहकरकडून डोणगावकडे येणारे अमोल धोटे व त्यांच्या मित्रांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी रस्त्याखाली पडलेल्या दोन्ही जखमींना बाहेर काढून मदत केली. तसेच 108 क्रमांकावर संपर्क साधून रुग्णवाहिका बोलावण्यात आली. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच डोणगाव पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. अपघातानंतर कंटेनर चालकाने डोणगाव पोलीस ठाण्यात स्वतःहून हजेरी लावली. दोन जिवलग मित्रांचा एकाच अपघातात दुर्दैवी अंत झाल्याने लक्ष्मी नगरसह संपूर्ण डोणगाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. 3 सप्टेंबर रोजी दोघांची अंत्ययात्रा एकाच वेळी निघाल्याने नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दोन्ही मित्रांना अखेरचा निरोप दिला. या घटनेने डोणगाव परिसरात शोककळा पसरली.


























































