
स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) मध्ये बचत खाते किंवा सॅलरी खाते असेल, तर बँकेने एटीएमच्या नियमात मोठे बदल केले आहेत. १ ऑक्टोबर २०२६ पासून मोठे बदल लागू होत आहेत. एसबीआय बचत खातेधारक आणि पगार खातेधारक या दोघांनाही रोख रक्कम काढण्यासाठी जास्त शुल्क भरावे लागेल. बँकेने आपल्या वेबसाइटवर या बदलाविषयी अद्ययावत माहिती दिली आहे.
स्टेट बँक ऑफ इंडियाच्या खातेधारकांसाठी अनेक नियम बदलणार आहेत, ज्यामुळे एसबीआय सॅलरी खातेधारकांचा खर्चही वाढणार आहे. १ ऑक्टोबरपासून शाखांमार्फत उघडलेल्या बेसिक सेव्हिंग्ज बँक डिपॉझिट (बीएसबीडी) खात्यांवर नवीन शुल्क लागू होईल. या बदलांनुसार ग्राहकांना दरमहा चारवेळा मोफत पैसे काढण्याची सुविधा पूर्वीप्रमाणेच मिळत राहील, परंतु या चार मोफत व्यवहारांनंतर, प्रत्येक एटीएममधून पैसे काढण्यासाठी त्यांना १५ अधिक जीएसटी शुल्क आकारले जाईल.
हे नवीन शुल्क केवळ एका महिन्यात चारपेक्षा जास्त वेळा पैसे काढल्यास लागू होईल. याचा अर्थ असा की, जे ग्राहक नियमितपणे एटीएममधून रोख रक्कम काढतात, त्यांना काढल्या जाणाऱ्या रोख रकमेबाबत विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.
१ ऑक्टोबरपासून एसबीआयच्या सॅलरी खात्याच्या नियमांमध्ये (एसबीआय सॅलरी अकाउंट रूल चेंज) होणाऱ्या बदलांनुसार, एसबीआय कर्मचाऱ्यांसाठी मासिक मोफत व्यवहारांची मर्यादा निम्म्याने कमी केली जात आहे. १ ऑक्टोबर २०२६ पासून, स्टेट बँक ऑफ इंडियामधील पगार खातेधारक इतर बँकांच्या एटीएम आणि ऑटोमेटेड डिपॉझिट अँड विथड्रॉवल मशीन्स (ADWMs) वर त्यांच्या डेबिट कार्डचा वापर करून दरमहा फक्त पाच व्यवहार करू शकतील. पूर्वी ही मर्यादा १० मोफत व्यवहारांची होती.
एसबीआयच्या एटीएम नियमांमधील बदलांनुसार, स्टेट बँकेने पगार खातेधारकांसाठी एटीएममधून पैसे काढण्याची मर्यादा कमी केली आहे, तसेच पाच मोफत व्यवहारांच्या मर्यादेमध्ये आर्थिक आणि गैर-आर्थिक दोन्ही व्यवहारांचा समावेश असेल, हे स्पष्ट केले आहे. सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास, यामध्ये केवळ रोख रक्कम काढणेच नव्हे, तर एटीएमद्वारे खात्यातील शिल्लक तपासणे आणि खात्याचे मिनी-स्टेटमेंट मिळवणे यांसारख्या गैर-आर्थिक सेवांचाही समावेश आहे. बँकेने दिलेल्या मर्यादेनंतर पैसे काढल्यास, महिन्याच्या सहाव्या व्यवहारावर प्रत्येक रोख रकमेसाठी जीएसटीसह २३ रुपये भरावे लागतील. तर, गैर-आर्थिक व्यवहारांसाठी, मोफत मर्यादेनंतर जीएसटीसह ११ रुपये भरावे लागतील.




























































