
कळवणच्या विसापूर आश्रमशाळेतील आठ वर्षीय विद्यार्थिनीच्या मृत्यूनंतर आदिवासी विकास विभाग खडबडून जागा झाला आहे. विषबाधेच्या संशयावरून ३० विद्यार्थ्यांना तातडीने कळवण उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, भयभीत झालेल्या पालकांनी या आश्रमशाळेतून चारशेहून अधिक मुले घरी नेली आहेत.
विसापूर आश्रमशाळेत इयत्ता दुसरीत शिकणाऱ्या सटाणा तालुक्यातील गोळवाड येथील सृष्टी सूर्यवंशी हिचा शुक्रवारी मृत्यू झाला. वेळेत उपचार न करता आश्रमशाळेने हलगर्जीपणा केल्याने पालकांमध्ये संताप आहे. ‘सेंट्रल किचन’च्या शिळ्या अन्नाने विषबाधा होत असून यामुळेच विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडत आहे, या संशयाने ३० विद्यार्थ्यांना कळवण उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना संसर्गजन्य आजार झाल्याचा दावा करून प्रशासनाकडून सारवासारव केली जात आहे.
मंत्री, सचिव, आयुक्तांनी राजीनामा द्यावा
विसापूरसह राज्यभरातील आश्रमशाळांची दैन्यावस्था झाली आहे. विद्यार्थ्यांचे जीव धोक्यात आले असून ते शिक्षणापासून वंचित राहत आहेत. याकडे दुर्लक्ष करणारे मंत्री अशोक उईके, आदिवासी विकास विभागाच्या आयुक्त लीना बनसोड आणि सचिव विजय वाघमारे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी सकल आदिवासी विद्यार्थी आंदोलन कृती समितीने केली आहे.
आश्रमशाळा रिकामी
मुलांचे जीव धोक्यात आल्याची भावना निर्माण झाल्याने पालक भयभीत झाले आहेत. शनिवारी सकाळपासून ठिकठिकाणाहून आलेल्या पालकांनी मुलांना आश्रमशाळेतून आपापल्या घरी नेले. एकूण ४५० पटसंख्या असलेल्या या आश्रमशाळेत सायंकाळपर्यंत चाळीसहून कमी विद्यार्थी उरले होते. आश्रमशाळा रिकामी होत असल्याने विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत आहेत.


























































