
श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त मंदिरांमध्ये केली जाणारी ‘छप्पन भोग’ महाप्रसादाची परंपरा यंदा खरसुंडी येथील श्री सिद्धनाथ मंदिरात प्रथमच अनुभवायला मिळाली. विविध पदार्थांची आकर्षक मांडणी, फुलांची सजावट आणि पारंपरिक पूजाविधी यामुळे मंदिर परिसरात भक्ती, सौंदर्य आणि आध्यात्मिकतेचा अनोखा संगम पाहायला मिळाला.
जन्माष्टमीनिमित्त पहाटे श्री सिद्धनाथ आणि माता जोगेश्वरी यांच्या मूर्तींना विधिवत अभ्यंगस्नान घालण्यात आले. त्यानंतर पारंपरिक अलंकार आणि पूजाविधीतील मांडणीमुळे श्री सिद्धनाथांच्या मूर्तीचे तेज अधिक खुलून दिसत होते. यावेळी माता जोगेश्वरी यांना नारंगी रंगाचा शालू नेसविण्यात आला होता. सालंकृत पूजेनंतर मंदिरात ‘छप्पन भोग’ महाप्रसादाची आकर्षक आरास करण्यात आली. विविध प्रकारचे गोड, तिखट, खारट आणि पारंपरिक पदार्थ सुबक पद्धतीने मांडण्यात आल्याने ही आरास भाविकांचे लक्ष वेधून घेत होती.
या महापूजेसाठी वंशपरंपरागत वहिवाटदार श्रीपूजक किशोर पुजारी, ऍड. प्रतीक पुजारी, प्रदीप पुजारी, प्रमोद पाटील, किरण भांगे, अभिषेक सावकार (पुजारी), शिवधन पाटील, भारत पुजारी, प्रशांत जरंडकर, प्रतीक अभंगराव, मुकुंद पोमधरणे, गोविंद पोमधरणे, किशोर बजरंग पुजारी, आनंदा पुजारी आदी बांधवांचे सहकार्य लाभले. महाप्रसादासाठी मुंबई पोलीस दलातील अतुल अवघडे, श्री ज्वेलर्सचे पंकज निकम तसेच पैलवान प्रमोद भोसले यांनी सहकार्य केले.




























































