
“विचार करा, या मुलांनी असा कोणता गुन्हा केला होता की त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या? त्यांनी सरकारकडे फक्त तीन गोष्टी मागितल्या होत्या, शिक्षण, रोजगार आणि उत्तरदायित्व,” अशा तीव्र शब्दांत लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी रविवारी सरकारवर हल्लाबोल केला. नुकतेच बिहारमधील सिवान येथे झालेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान पोलिसांनी केलेल्या गोळीबारात जखमी झालेल्या तीन विद्यार्थ्यांची राहुल गांधी यांनी दिल्लीत भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी X वर एक व्हिडिओ शेअर करत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बिहारचे मुख्यमंत्री यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली आहे.
राहुल गांधी यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, या आंदोलनात एका विद्यार्थ्याच्या पायाचे हाड AK-47 च्या गोळीने मोडले असून, यासोबतच सैन्यात जाऊन देशाची सेवा करण्याचे त्याचे स्वप्नही कायमचे उद्ध्वस्त झाले आहे. तसेच इतर दोन विद्यार्थ्यांच्या खांद्यातूनही गोळ्या आरपार गेल्याचे ते म्हणाले.
“ही मुले गुन्हेगार नव्हती. ती गरीब कुटुंबातील होती आणि आपल्या कुटुंबाची स्वप्ने उराशी बाळगून शिक्षणासाठी घराबाहेर पडली होती. काहींना चांगली नोकरी हवी होती, तर काहींना आपल्या घराची परिस्थिती बदलायची होती,” असे राहुल गांधी म्हणाले. विद्यार्थ्यांच्या शारीरिक जखमा भरून निघतील, मात्र त्यांच्या मनात घर करून राहिलेली भीती आणि त्यांच्या उद्ध्वस्त झालेल्या स्वप्नांवर कोण उपचार करणार? असा सवालही त्यांनी विचारला. “पंतप्रधानजी, मुख्यमंत्रीजी , त्यांची मोडलेली हाडे जुळतील. पण तुम्ही त्यांची उद्ध्वस्त झालेली स्वप्ने परत देऊ शकता का?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

























































