
दहीहंडी उत्सवानंतर नवापूर येथे पिकनिकसाठी गेलेल्या मुंबईतील महिला गोविंदा पथकातील काही सदस्यांनी विरार पश्चिम, वटार येथील मानवेल पेट्रोल पंपावर राडा केला. यावेळी पेट्रोल पंपावरील एका कर्मचाऱ्याला क्षुल्लक कारणावरून बेदम मारहाण करण्यात आल्याने तो जखमी झाला.
बांद्रा पश्चिम येथील महिला गोविंदा पथकाने’ शनिवारी रात्री उशिरापर्यंत दहीहंडी उत्सवानिमित्त मुंबईतील विविध ठिकाणी सहभाग घेत पंधराहून अधिक दहीहंडी फोडल्या. त्यानंतर आज पथकाच्या अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली सुमारे 40 महिला व लहान मुले व ज्येष्ठ नागरिक नवापूर येथे पिकनिकसाठी गेले. त्यानंतर सायंकाळी सातच्या सुमारास या महिला मुंबईच्या दिशेने परतीच्या प्रवासाला निघाल्या. परतीच्या प्रवासात बसमध्ये डिझेल भरण्यासाठी विरार पश्चिमेतील वटार येथील मानवेल पेट्रोल पंपावर बस थांबविण्यात आली. यावेळी बसमधून बिस्कीटचे रिकामे पाकीट बाहेर फेकणाऱ्यांना पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याने हटकले. यावरून बसमधील महिलांचा कर्मचाऱ्यासोबत वाद झाला. त्यानंतर बसमधील काही महिला खाली उतरल्या आणि कर्मचाऱ्यासोबत धक्काबुक्की झाल्याचे सांगण्यात येते. काही वेळाने बसमधील एका तरुणाने उतरून त्याच कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केली. या मारहाणीत कर्मचारी जखमी होऊन रक्तबंबाळ झाल्याने पेट्रोल पंपावरील इतर कर्मचाऱ्यांनी बसची चावी काढून घेत पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी मध्यस्थी करून जखमी तरुणाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर महिला गोविंदा पथकाची बस पोलिसांनी सोडून दिली.
























































