धार्मिक उत्सवासाठी साठवलेल्या फटाक्यांचा भीषण स्फोट; चर्चजवळ प्रार्थनेसाठी जमलेल्या 10 जणांचा मृत्यू, 64 गंभीर जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मेक्सिकोत एका धार्मिक उत्सवाला गालबोट लागले आहे. उत्सवासाठी साठवून ठेवण्यात आलेल्या फटाक्यांचा अचानक भीषण स्फोट झाला. या भीषण स्फोट चर्चजवळ प्रार्थनेसाठी जमलेल्या 10 जणांचा होरपळून मृत्यू झाला, तर 64 हून अधिक नागरिक गंभीर जखमी झाले आहेत. स्थानिक प्रशासनाने या घटनेला दुजोरा दिला असून तेमास्काल्सिंगो नगरपालिकेतील सांता मारिया कांचेसडा या गावात ही घटना घडल्याचे वृत्त ‘अल जझीरा‘ने दिले आहे.

गावातील मुख्य चर्चच्या प्रांगणात नागरिक आपले ग्रामदैवत अर्थात पेट्रन सेंटच्या आगामी उत्सवाची पूर्वतयारी आणि संध्याकाळच्या प्रार्थनेसाठी मोठ्या संख्येने एकत्र आले होते. नागरिक पेंढ्यापासून बनवलेल्या एका बैलाची प्रतिकृती उचलून नेते होते आणि यातून फटाकेही फुटत होते.

हा पारंपरिक विधी सुरू असतानाच, बैलाच्या प्रतिकृतीतून उडालेल्या एका ठिणगीमुळे चर्चच्या प्रांगणात साठवून ठेवलेल्या मोठ्या फटाक्यांच्या साठ्याने पेट घेतला. क्षणार्धात मोठा स्फोट झाला आणि आगीचे प्रचंड लोट पसरले. स्फोटाचा प्रभाव इतका तीव्र होता की चर्चच्या भिंती कोसळल्या आणि या भागात भीषण आग लागली. अनेक नागरिक चर्चच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले आणि आगीमध्ये होरपळून गेले, असे वृत्त स्थानिक माध्यमांनी दिले.

दरम्यान, या घटनेत जवळच असलेल्या अतलाकोमुल्को दिओसेसमधील दोन धर्मगुरू देखील जखमी झाले असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेनंतर बचाव पथकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले.

मेक्सिकोच्या अ‍ॅटर्नी जनरल कार्यालयाने या स्फोटाच्या कारणाचा शोध घेण्यासाठी औपचारिक तपास सुरू केला आहे. मेक्सिकोमध्ये सणासुदीच्या काळात फटाक्यांमुळे अशा प्राणघातक दुर्घटना घडण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी जुलै 2018 मध्ये तुलतेपेक येथील फटाक्यांच्या कारखान्यात झालेल्या स्फोटात 24 जणांचा, तर 2016 मध्ये एका फटाक्यांच्या बाजारात झालेल्या स्फोटात 42 जणांचा मृत्यू झाला होता.