शेफाली वर्माला डिवचणाऱ्या पाकिस्तानच्या कर्णधाराला आयसीसीचा दणका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महिला आशिया कपच्या ‘अ’ गटातील सामन्यात भारतीय संघाकडून पराभव झाल्यानंतर पाकिस्तान क्रिकेट संघाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. पाकिस्तानी कर्णधार फातिमा सनावर मैदानातील वाईट वर्तन आणि खेळाच्या भावनेच्या विरुद्ध वागणुकीबद्दल आयसीसीने कारवाई केली आहे. भारतीय डावादरम्यान घडलेल्या या घटनेनंतर सामनाधिकाऱ्याने तिच्या मानधनाच्या 10 टक्के दंड आकारला आहे.

शेफाली वर्माच्या दिशेने हावभाव केल्याबद्दल शिक्षा

दुसऱ्या षटकात फातिमाने भारतीय सलामीवीर फलंदाज शेफाली वर्माला पॅव्हेलियनमध्ये परत पाठवले आणि आनंद साजरा करण्याऐवजी तिने फलंदाजाच्या दिशेने एक अयोग्य हावभाव केला, तेव्हा हा वाद निर्माण झाला. फातिमा सना आयसीसीच्या आचारसंहितेच्या नियम 2.5चे उल्लंघन केल्याबद्दल दोषी आढळली आहे. हा नियम फलंदाजाला बाद केल्यानंतर अपमानजनक किंवा चिथावणीखोर भाषा, हावभाव किंवा कृती वापरण्याशी संबंधित आहे.

पाकिस्तानी कर्णधाराने चूक केली कबूल

मैदानावरील पंचांच्या तक्रारीनंतर आयसीसीच्या सामनाधिकारी सुप्रिया राणी दास यांनी फातिमाला या कृत्यासाठी दोषी ठरवले. पण पाकिस्तानी कर्णधाराने आपली चूक कबूल केल्यामुळे औपचारिक सुनावणीची गरज उरली नाही. आयसीसीच्या कठोर नियमांनुसार तिला सुधारण्याचा इशारा देण्यात आला आहे आणि एक डिमेरिट पॉइंटही देण्यात आला आहे.

दोन वर्षांत दुसऱ्यांदा चूक

गेल्या 24 महिन्यांत फातिमा सनाची ही दुसरी चूक आहे. यापूर्वी तिला 6 ऑगस्ट 2025 रोजी डब्लिनमध्ये आयर्लंडविरुद्धच्या टी-20 सामन्यादरम्यान एक डिमेरिट पॉइंट मिळाला होता. या कृतीमुळे तिने आता तिच्या 24 महिन्यांच्या कालावधीत एकूण दोन डिमेरिट पॉइंट्स जमा केले आहेत.

पुढील चुका केल्यास बंदीची कारवाई

आयसीसीच्या कठोर शिस्तभंगाच्या नियमांनुसार जर एखाद्या खेळाडूने 24 महिन्यांच्या कालावधीत चार किंवा अधिक डिमेरिट पॉइंट्स जमा केले तर त्यांचे रूपांतर सस्पेंशन पॉइंट्समध्ये केले जाते. दोन सस्पेंशन पॉइंट्स म्हणजे थेट एका कसोटी सामन्याची किंवा दोन एकदिवसीय/टी-20 सामन्यांची बंदी असते. त्यामुळे फातिमा सनाला आता आगामी सामन्यांमध्ये आपल्या आक्रमक वर्तनावर नियंत्रण ठेवावे लागेल, अन्यथा आणखी एखादी चूक केल्यास तिच्यावर मैदानातून बंदी घातली जाऊ शकते.