
आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या इराणमध्ये पेट्रोलच्या दरात पुन्हा वाढ करण्यात आली आहे. मंगळवारी पहाटेपासून महिन्याला निर्धारित कोट्यापेक्षा अधिक पेट्रोल खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी नवा दर लागू करण्यात आला. डिसेंबरनंतरची ही दुसरी दरवाढ आहे.
नव्या दररचनेनुसार, महिन्याला 110 लिटर (29 गॅलन)पेक्षा अधिक पेट्रोल खरेदी करणाऱ्या ग्राहकांना प्रति लिटर 1 लाख रियाल, म्हणजेच डिसेंबरपासून लागू असलेल्या दराच्या दुप्पट रक्कम मोजावी लागणार आहे. सरकारने या निर्णयामागे सध्याच्या परिस्थितीचा दाखला दिला असून, दरवाढीतून मिळणारा अतिरिक्त पैसा कुटुंबांना देण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. सरकारच्या निवेदनात अमेरिकेसोबत सुरू असलेल्या युद्धाचा थेट उल्लेख करण्यात आलेला नाही.
इराणमध्ये पेट्रोलचे दर अद्यापही जगातील सर्वात कमी दरांपैकी आहेत. मात्र, या दरवाढीमुळे 9 कोटींहून अधिक लोकसंख्या असलेल्या देशातील नागरिकांवरील दैनंदिन आर्थिक दबाव आणखी वाढण्याची शक्यता आहे. इराणचे चलन विक्रमी नीचांकी पातळीवर घसरले असून नागरिकांची क्रयशक्तीही कमी झाली आहे. सोमवारी एका अमेरिकी डॉलरची किंमत 22.2 लाख रियाल इतकी होती.
राज्य तेल वितरण कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी केरामत वेस कारामी यांनी दिलेल्या माहितीनुसार, नव्या दराचा परिणाम सुमारे 15 टक्के पेट्रोल ग्राहकांवर होणार आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, ऑगस्टमध्ये इराणमधील पेट्रोलचा दैनंदिन वापर विक्रमी 14.5 कोटी लिटर झाला. त्याच्या तुलनेत देशाची देशांतर्गत उत्पादन क्षमता सुमारे 12.2 कोटी लिटर प्रतिदिन आहे. त्यामुळे उर्वरित गरज आयातीद्वारे भागवावी लागते.
महागाई वाढण्याची भीती
पेट्रोलच्या दरात वाढ केल्याने इंधनाचा वाढता वापर कमी करण्यास मदत होऊ शकते. इराणमधील जुन्या वाहनांचा मोठा ताफा, सुट्या भागांची कमतरता आणि अपुरी सार्वजनिक वाहतूक ही पेट्रोलच्या वाढत्या वापरामागील प्रमुख कारणे असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
मात्र, पेट्रोलच्या दरवाढीमुळे आधीच गंभीर आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या इराणमध्ये महागाई आणखी वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. देशाच्या सांख्यिकी केंद्राच्या आकडेवारीनुसार, इराणमध्ये वार्षिक महागाईचा दर सुमारे 67 टक्के आहे.
पेट्रोल पंपांवर कडेकोट सुरक्षा
नवीन दर लागू झाल्यानंतर अवघ्या एका तासाने असोसिएटेड प्रेसच्या प्रतिनिधींनी पाहणी केलेल्या आठ पेट्रोल पंपांपैकी दोन पंप दररचनेत बदल करण्यासाठी बंद करण्यात आले होते. उर्वरित सहा पेट्रोल पंप सुरू होते आणि प्रत्येक पंपावर सुमारे डझनभर वाहने रांगेत उभी होती.
पेट्रोल पंपांच्या परिसरात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली होती. गणवेशातील तसेच साध्या वेशातील पोलिसही परिसरात तैनात होते.

























































