मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्या जम्मूतील निवासस्थानी घुसला गर्दुल्ला, सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्या जम्मूतील अधिकृत निवासस्थानी एका 21 वर्षीय गर्दुल्ल्याने घुसखोरी केल्याची घटना शुक्रवारी घडली. दिवसाढवळ्या वझारत रोडवरील मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी तरुण शिरल्याने सुरक्षा व्यवस्थेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

घटना घडली त्यावेळी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला दिल्लीमध्ये होते. त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. जम्मू-काश्मीरला पुन्हा राज्याचा दर्जा देणे, निवडून आलेल्या सरकार आणि नायब राज्यपालांमधील समन्वयाचे नियम तसेच आरक्षणाचे तर्कसंगतीकरण यांसह विविध मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा झाल्याचे वृत्त आहे.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राथमिक चौकशीत या तरुणाचा कोणत्याही दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याचे किंवा त्याचा घुसखोरीमागे कोणताही घातपाती हेतू असल्याचे आढळलेले नाही. अमली पदार्थांचे व्यसन असलेल्या या तरुणाला मुख्यमंत्री आणि त्यांच्या कुटुंबाच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या स्पेशल सिक्युरिटी ग्रुपने (SSG) ताब्यात घेतले. त्यानंतर चौकशीसाठी त्याला गुज्जर नगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

अंमली पदार्थांच्या गुन्ह्यात अटक

अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, रियासीचा रहिवासी असलेला हा तरुण 3 ऑगस्ट रोजी एका मित्रासोबत जम्मूमध्ये आला होता. त्याच दिवशी संध्याकाळी तो नशेच्या अवस्थेत आढळल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्याविरोधात अमली पदार्थ आणि मनोविकारजन्य पदार्थ कायद्यांतर्गत (NDPS Act) गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांनी संपर्क साधल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याचे आई-वडील पोलीस चौकीत पोहोचले. संबंधित गुन्हा जामीनपात्र असून त्यासाठी जास्तीत जास्त एक वर्षापर्यंतची शिक्षा होऊ शकते. त्यामुळे त्याची सुटका होण्याची शक्यता होती. मात्र, पोलिसांनी त्याच्या वडिलांना स्थानिक जामीनदाराची व्यवस्था करण्यास सांगितले.

वडील जामीनदार शोधण्यासाठी गेले अन् तरुण पसार

वडील जामीनदार म्हणून उभे राहण्यासाठी स्थानिक व्यक्तीचा शोध घेण्यासाठी गेले असताना तरुणाने पोलिसांच्या ताब्यातून कथितपणे पलायन केले. त्यानंतर जवळच्या टेकडीवर चढून त्याने मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाच्या मागील बाजूची भिंत ओलांडली आणि घराच्या परिसरात प्रवेश केला. SSGच्या जवानांना काही वेळातच ही बाब लक्षात आली आणि त्यांनी त्याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान वडील पुन्हा परतणार नाहीत, अशी भीती वाटल्याने आपण पळून गेल्याचे त्याने सांगितल्याचे अधिकाऱ्यांनी नमूद केले.

नंतर त्याच्याविरोधात मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी बेकायदेशीर प्रवेश केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्याची जामिनावर सुटका करण्यात आली.

मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेवरून चिंता

या घटनेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला तसेच त्यांचे वडील आणि जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूक अब्दुल्ला यांच्या सुरक्षाव्यवस्थेबाबत नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांकडून यापूर्वी व्यक्त करण्यात आलेल्या चिंता पुन्हा चर्चेत आल्या आहेत.