उरणच्या माणकेश्वर समुद्रात स्कॉर्पिओ बुडाली; सहा पर्यटक बचावले, भरतीचे पाणी वाढल्याने कार वाळूत रुतली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

समुद्रकिनाऱ्यावर स्कॉर्पिओने जाऊन ओली पार्टी करणे कामोठ्यातील काही पर्यटकांच्या चांगलेच अंगलट आले आहे. उरणच्या माणकेश्वर किनाऱ्यावर या पर्यटकांनी कार वाळूत उतरवून खवळलेल्या लाटांमधून चार-पाच राऊंड मारले. त्यानंतर ‘हुक्की’ आलेल्या या बेशिस्त पर्यटकांनी तेथे गाडी उभी करून पेगवर पेग रिचवले. मात्र ही नशा त्यांच्या डोक्यात इतकी भिनली की, भरतीच्या पाण्याने त्यांना कधी आपल्या कवेत घेतले हेच त्यांना कळले नाही. सुदैवाने स्थानिकांनी धाव घेऊन तर्राट पर्यटकांना आणि त्यांच्या पाण्यावर तरंगत असलेल्या स्कॉर्पिओला बाहेर काढले.

कामोठे येथे राहणारे सहा पर्यटक स्कॉर्पिओ घेऊन माणकेश्वर-दांडा समुद्रकिनाऱ्यावर मौजमजा करण्यासाठी आले होते. या अतिउत्साही पर्यटकांनी कार वाळूत उतरवली आणि समुद्राच्या लाटांमधून गाडीने चार-पाच चकरा मारल्या. त्यानंतर गाडी वाळूतच उभी करून ओली पार्टी सुरू केली. हळूहळू भरतीचे पाणी वाढू लागल्याने कार वाळूत रुतत गेली. हे पर्यटक एवढे तर्राट झाले की आपली कार पाण्यात बुडतेय हेही त्यांच्या लक्षात आले नाही. मात्र भरतीचे पाणी आणखी वाढल्याने पर्यटकांची झिंग उतरली. त्यांनी कार पाण्याबाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना यश आले नाही.

दोन वेळा बैलगाडी पलटी

समुद्रकिनारी आलेल्या स्थानिकांनीही बैल गाडीच्या सहाय्याने गाडी बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केला. परंतु बैलगाडीच दोन वेळा पलटी झाली. त्यानंतर स्थानिकांनी दोन तासांनी ही कार पाण्याबाहेर काढली. माणकेश्वर-दांडा समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांनी गाड्या नेऊ नये असे स्थानिकांकडून वारंवार आवाहन केले जाते. मात्र अतिउत्साही पर्यटक वाळूत गाड्या नेतात. त्यामुळे अशा घटना घडतात, असे स्थानिकांनी सांगितले.