‘प्रश्न विचारणाऱ्यांना चिरडण्याचा प्रयत्न’, पंजाब सरकारवर राहुल गांधींचा हल्लाबोल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पंजाबमधील आम आदमी पक्षाच्या सरकारवर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी जोरदार टीका केली आहे. सरकारच्या अपयशावर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना धमक्या आणि छळाला सामोरे जावे लागत असल्याचा आरोप त्यांनी केला. पंजाबमध्ये अंमली पदार्थांच्या समस्येवर राज्याचे अर्थमंत्री हरपाल सिंह चीमा यांना जाहीरपणे प्रश्न विचारल्यानंतर माफी मागण्यासाठी कथित दबाव टाकण्यात आला आणि त्यानंतर एका व्यक्तीने विष प्राशन करून आत्महत्या केल्याच्या घटनेवरून राहुल गांधी यांनी हा हल्लाबोल केला.

राहुल गांधी यांनी बुधवारी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर पोस्ट करत पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी तातडीने अर्थमंत्री हरपाल सिंह चीमा यांचा राजीनामा मागावा, तसेच या प्रकरणाची स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी सुनिश्चित करावी, अशी मागणी केली.

‘प्रश्न विचारल्यास धमक्या आणि छळ’

“पंजाबच्या ‘आप’ सरकारमध्ये एक धोकादायक पॅटर्न निर्माण होत आहे. सरकारच्या अपयशावर प्रश्न उपस्थित केल्यास त्याला धमक्या आणि छळाच्या माध्यमातून उत्तर दिले जाते,” असा आरोप राहुल गांधी यांनी केला.

गुलजार सिंह हे दलित समाजातील होते. त्यांच्या मुलाला अमली पदार्थांच्या व्यसनाचा फटका बसल्याने त्यांनी पंजाबमधील वाढत्या अंमली पदार्थांच्या व्यापाराबाबत अर्थमंत्री हरपाल सिंह चीमा यांना प्रश्न विचारला होता. “अंमली पदार्थांचा व्यापार रोखण्यात सरकार इतके अपयशी का ठरले?” एवढाच प्रश्न त्यांनी विचारला होता, असे राहुल गांधी यांनी म्हटले.

यानंतर गुलजार सिंह यांना माफी मागण्यासाठी कथितरीत्या दबाव टाकण्यात आला. त्यांचा छळ आणि अपमान करण्यात आला. या दबावामुळे त्यांनी विष प्राशन केले. त्यानंतर उपचारासाठी त्यांना एका रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात नेण्यात आले; मात्र योग्य उपचार मिळू न शकल्याने अखेर त्यांचा मृत्यू झाला, असा दावा राहुल गांधी यांनी केला.

‘सरकारचे काम प्रश्न विचारणाऱ्यांना चिरडणे नाही’

“सरकारचे काम जनतेला उत्तर देणे आहे, प्रश्न विचारणाऱ्यांना चिरडणे नाही,” असे राहुल गांधी यांनी म्हटले. गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या विरोधात आंदोलन केल्यामुळे कथित छळाला सामोरे गेलेल्या तरुण मोहंतीजित सिंह यांच्याशीही आपण संवाद साधल्याचे त्यांनी सांगितले.