बाप्पाच्या विसर्जनासाठी कृत्रिम हौदावर खर्च केलेले सवापाच कोटी कुठे ‘बुडाले’? कल्याण-डोंबिवली महापालिकेकडे हिशेबच नाही

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने गेल्या वर्षी सर्व प्रभाग क्षेत्रात बाप्पाच्या विसर्जनासाठी कृत्रिम हौद तयार केले होते. यासाठी पालिकेने तब्बल पाच कोटी २६ लाख रुपये खर्च केले. मात्र या खर्चाचा हिशेबच पालिकेकडे नसल्याचे माहितीच्या अधिकारातून उघड झाले आहे. कृत्रिम हौदावर खर्च केलेले सवापाच कोटी कुठे ‘बुडाले’, असा सवाल त्यामुळे निर्माण झाला आहे.

२०२५ मध्ये कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात अंदाजे ५२ हजार गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. यामध्ये २१३ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचाही समावेश होता. विसर्जनासाठी महापालिकेने कल्याण आणि डोंबिवली परिसरात व्यवस्था उपलब्ध केली होती. कल्याण, डोंबिवली परिसरात ५२ नैसर्गिक विसर्जनस्थळे, ६ कृत्रिम हौद, ६२ सिंटेक्स टाक्या आणि ८ फिरते विसर्जन कक्ष उभारण्यात आले होते. तसेच ‘विसर्जन आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत एकूण १३० ठिकाणी विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र विसर्जनानंतर कृत्रिम हौदांमधील पाण्यावर कोणती प्रक्रिया करण्यात आली आणि त्यामध्ये विसर्जित झालेल्या गणेशमूर्तीची पुढे कशाप्रकारे विल्हेवाट लावण्यात आली, याबाबत माहिती अधिकार कार्यकर्ते विजय ठाकरे यांनी विचारले असता याबाबतची कार्यपद्धती अभिलेखात उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान या संपूर्ण प्रकरणाबाबत केडीएमसीचे उपायुक्त विराज लबडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी संबंधित विभागाकडून माहिता घेउन सांगतो, अशी ढोबळ प्रतिक्रिया दिली.

… तर अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करू
केडीएमसी विसर्जनाच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचा खर्च करते. मात्र त्याची जबाबदारी निश्चित होणे आवश्यक आहे. भक्तांनी प्राणप्रतिष्ठा केलेल्या हजारो गणेशमूर्तीचे कृत्रिम तलावात विसर्जन झाल्यानंतर महापालिका त्यांचे पुढे काय करते याची माहितीच महापालिकेकडे उपलब्ध नसेल तर हा प्रकार गणेशभक्तांच्या धार्मिक भावना दुखावणारा आहे. असेच प्रकार सुरू राहिले तर अधिकाऱ्यांविरोधात धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचा इशारा विजय ठाकरे यांनी दिला आहे.