
गणेश कुंटेवार
भगवान शिवला अत्यंत प्रिय मानल्या जाणार्या पवित्र बेलवृक्षाच्या पानांमध्ये आढळणार्या अत्यंत दुर्मिळ बहुदलीय सातपानी पानांच्या वैशिष्ट्यपूर्ण स्वरूपाचा नांदेड जिल्ह्यातील अभ्यास आता आंतरराष्ट्रीय वनस्पतीशास्त्रीय संशोधनाच्या पटलावर पोहोचला आहे. नांदेड वनविभागात वनरक्षक म्हणून कार्यरत असलेले शिवसांब घोडके यांनी सुमारे दोन वर्षे प्रत्यक्ष क्षेत्रावर सातत्याने निरीक्षणे, नोंदी आणि अभ्यास करून केलेल्या संशोधनाला आंतरराष्ट्रीय संशोधन पत्रिकेत प्रसिद्धी मिळाली आहे.
वनस्पतीशास्त्रीय दृष्टिकोनातून बेलाच्या पानांची रचना प्रामुख्याने त्रिदलीय म्हणून ओळखली जाते. मात्र नांदेड जिल्ह्यातील क्षेत्रीय पाहणीदरम्यान बेलाच्या पानांमध्ये तीन ते सात पानिकांची बहुदलीय रचना आढळून आली. यातील सात पानिकांचे स्वरूप अत्यंत दुर्मिळ असल्याचे या अभ्यासातून अधोरेखित झाले आहे. वनरक्षक शिवसांब घोडके यांनी सुमारे दोन वर्षे सातत्याने या दुर्मिळ बेलवृक्षाचे निरीक्षण करून त्याच्या पानांच्या रचनेबाबत नोंदी घेतल्या. क्षेत्रभेटी दरम्यान आढळलेल्या वनस्पतीचे स्वरूप, पाने, पानिकांची संख्या, रचना आणि इतर वनस्पतीशास्त्रीय वैशिष्ट्यांचा अभ्यास करण्यात आला.
संशोधनात बेलाच्या वनस्पतीचे शास्त्रीय वर्णन हा काटेरी लहान वृक्ष असून त्याच्या फांद्यांवर सुमारे १ ते २.५ सेंमी लांबीचे मजबूत, सरळ व टोकदार काटे आढळतात. पानांमध्ये ३ ते ७ पानिकांची रचना, म्हणजेच त्रिदलीय ते बहुदलीय स्वरूप आढळू शकते. पानिकांचा आकार लॅन्सिओलेट किंवा इलिप्टिक-लॅन्सिओलेट प्रकारचा असून त्यांची लांबी व रुंदी यांचाही संशोधनपत्रात उल्लेख करण्यात आला आहे.
फुले हिरवट-पांढर्या रंगाची असून ती द्विलिंगी असतात. फुलांमध्ये अनेक पुंकेसर असतात. फळ गोलसर असून त्याचा आकार साधारण ५ ते १२ सेंमी व्यासाचा असल्याचे वर्णन करण्यात आले आहे. फळातील गर गोड, जाडसर आणि नारिंगी रंगाचा असल्याचेही संशोधनपत्रात नमूद आहे.
नांदेड जिल्हा हा जैवविविधतेच्या दृष्टीने समृद्ध असून जिल्ह्यात विविध प्रकारच्या देशी, दुर्मिळ, औषधी आणि उपयुक्त वनस्पती आढळतात. या संशोधनामुळे नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील पानभोसी येथील वनसंपदेतील एका दुर्मिळ वनस्पतीवैशिष्ट्याची शास्त्रीय नोंद झाली असून, स्थानिक जैवविविधतेच्या अभ्यासाला यामुळे नवी दिशा मिळण्याची शक्यता आहे. शिवसांब बाबुराव घोडके हे केवळ वनसेवेत कार्यरत वनरक्षक नसून वनस्पतीशास्त्राचा अभ्यास असलेले उच्चशिक्षित वनसेवक आहेत. त्यांनी नांदेड जिल्ह्यातील विविध देशी, दुर्मिळ आणि औषधी वनस्पतींच्या अभ्यासात रस घेतला आहे. यामध्ये माकडशिंगी, गोरखचिंच, हुंब यांसारख्या वनस्पतींच्या अभ्यासाचा समावेश आहे. पानभोसी येथे देशी, दुर्मिळ आणि औषधी वनस्पतींची बीज बँक तयार केली आहे. तसेच पर्यावरणीय कार्यातील आणखी एक उल्लेखनीय बाब म्हणजे सिद्धेश्वर महादेव मंदिर, माळ पानभोसी येथे दररोज किमान एक रोप लागवड चळवळ तब्बल १७१३ दिवस अखंडपणे सुरू आहे.
श्रावण महिन्यात बेलाच्या संशोधनाला विशेष महत्त्व बेलपत्राला हिंदू धार्मिक परंपरेत विशेष स्थान असून भगवान शिवाला बेलपत्र अत्यंत प्रिय असल्याची श्रद्धा आहे. अशा या पवित्र बेलवृक्षाच्या दुर्मिळ सातपानी स्वरूपाचा अभ्यास आणि त्याची आंतरराष्ट्रीय संशोधन पत्रिकेतील प्रसिद्धी पवित्र श्रावण महिन्यात होत असल्याने या घटनेला विशेष भावनिक आणि सांस्कृतिक संदर्भ प्राप्त झाला आहे.




























































