
ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर वरळी बीडीडी चाळीतील ५७४ कुटुंबीयांचे नव्या घराचे स्वप्न साकार होणार आहे. बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत वरळी बीडीडीतील आणखी ५७४ कुटुंबीयांना आजपासून टप्प्याटप्प्याने घरांच्या चाव्यांचे वाटप केले जाणार आहे. पुनर्वसन इमारत क्र. १ मधील ‘बी’ आणि ‘सी’ टॉवरमध्ये ही घरे आहेत.
बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प हा राज्य शासनाचा अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या माध्यमातून वरळी, नायगाव आणि ना. म. जोशी मार्ग येथील बीडीडी चाळींचा पुनर्विकास केला जात आहे. महाविकास आघाडीच्या काळात या प्रकल्पाचे काम सुरू झाले आहे. शिवसेना नेते व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे वेळोवेळी या प्रकल्पांना भेट देऊन कामाच्या प्रगतीचा आढावा घेतात. या प्रकल्पाद्वारे १२१ जुन्या चाळींतील ९ हजार ६८९ रहिवाशांचे पुनर्वसन होणार आहे.
























































