जमिनीचा इतिहास मिळणार एका क्लिकवर, आता तहसील कार्यालयाचे उंबरठे झिजवण्याची गरज नाही; महसूल विभागाचा ‘महाभूमी स्टॅक’ ऍप सुरू,30 वर्षांचे नकाशे, सातबारे, फेरफार उपलब्ध

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जमिनीबाबत माहिती घेण्यासाठी आता नागरिकांना आणि शेतकऱ्यांना तलाठी, तहसीलदार किंवा भूमी अभिलेख कार्यालयात हेलपाटे मारावे लागणार नाहीत. मुंबईसह राज्यातील जमिनीचा संपूर्ण इतिहास एका क्लिकवर उपलब्ध झाला आहे. राज्य शासनाने विकसित केलेल्या महाभूमी स्टॅकवर जमिनीचे गेल्या 30 वर्षांचे नकाशे अक्षांशरेखांशासह तसेच सातबारा, फेरफार उपलब्ध करून देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, यावर राज्यातील कोणत्याही जमिनीची माहिती कुणालाही मिळू शकणार आहे.

मुंबईतील सर्व मालमत्ता होणार ऑनलाइन

मुंबईतील सर्व मालमत्तांची माहिती या ऍपवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. मुंबईत गगनचुंबी इमारती आहेत. त्यात राहणारे रहिवासी त्यांच्या घरांचे मालक आहेतच, पण आता ती इमारत ज्या जागेवर उभी आहे त्या जागेतही त्यांना हिस्सा मिळणार आहे.

जमिनीचा सध्याचा बाजारभावही समजणार

सरकारी आणि खासगी जमिनींचा जुना इतिहास, त्यांची सद्यस्थिती, मोजणीचा तपशील आणि सध्याच्या बाजारभावाप्रमाणे जमिनीचे मूल्यांकन ही सर्व माहिती ‘महाभूमी स्टॅक’ या ऍपवर एकाच ठिकाणी उपलब्ध आहे.

‘महाभूमी स्टॅक’ ऍपवर विखुरलेल्या विविध प्रणालींचे एकत्रीकरण करून 10 प्रमुख भूमीसेवांसाठी एकच प्रणाली तयार करण्यात आली आहे. जमिनीची खरेदी-विक्री आणि इतर सर्व व्यवहारांमध्ये पारदर्शकता आणि सुलभता आणण्यासाठी हे ऍप फायदेशीर ठरणार आहे. जमिनींचे दीड कोटी नकाशे, मोजणीची 7 लाख कागदपत्रे, जुने फेरफार आणि नोंदणी दस्त त्यावर उपलब्ध करण्यात आले आहेत. या ऍपवर अपलोड करण्यासाठी राज्यभरातील तब्बल 36 कोटी जुने दस्तावेज स्कॅन केले गेले, अशी माहिती महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली.

प्रत्येकाची मालमत्ता निश्चित होणार

महाभूमी स्टॅकमुळे राज्यात राहणाऱ्या आणि इथे असणाऱ्या प्रत्येकाची भूमीस्वरूपातील मालमत्ता निश्चित होणार आहे. त्यामुळे शासकीय जमीन विकण्याचे तसेच त्यावर अतिक्रमण करण्याच्या प्रकारांना आळा घातला जाऊ शकणार आहे. मोजणीशिवाय नोंदणी अशक्य, 500 खासगी सर्व्हेअर नेमले.

तहसीलदार, जिल्हाधिकाऱ्यांनी दुपारी 3 ते 5 जनतेला भेटावे

नायब तहसीलदार ते जिल्हाधिकारी यांनी जनतेला कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी दुपारी 3 ते 5 वेळेत भेटावे व तसे फलक कार्यालयाबाहेर दर्शनी भागात लावावेत आणि या वेळेत ऑनलाईन बैठका टाळाव्यात, असे स्पष्ट निर्देश बावनकुळे यांनी दिले.