
अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयातील आगीत तीन बालकांचा मृत्यू झाला होता. या जळीत कांड प्रकरणाचा चौकशी करण्यासाठी नेमलेल्या उच्चस्तरीय समितीचा अहवाल शासनास प्राप्त झाला आहे. या अहवालाच्या आधारे पर्यवेक्षीय नियंत्रणातील त्रुटींसाठी अकोल्याचे आरोग्य सेवा उपसंचालक, रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक, अमरावतीचे अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक, प्रशासकीय अधिकारी आणि इलेक्ट्रिशियन यांना जबाबदार ठरवत त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत.
भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी शासनाने राज्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये सुरक्षा उपाययोजनांना अधिक बळ देण्याचा निर्णय घेतला आहे. एसएनसीयू आणि एनआयसीयूमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्याचे, तसेच सर्व रुग्णालयांमध्ये अग्निसुरक्षा मॉक ड्रील अनिवार्य करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अग्निसुरक्षा, विद्युत सुरक्षा आणि वैद्यकीय उपकरणांची देखभाल याबाबत मानक कार्यपद्धती लागू करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
आरोग्य सेवा आयुक्त संजय काटकर यांनी सार्वजनिक बांधकाम, विद्युत, अग्निशमन, जैव-तांत्रिक आणि देखभाल-दुरुस्ती यंत्रणांच्या नियमित बैठका घेऊन रुग्णालयांच्या सुरक्षेचा आढावा, तसेच आवश्यक त्या उपाययोजनांवर प्रभावी नियंत्रण ठेवावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
दोन कंपन्या काळ्या यादीत
चौकशी समितीच्या अहवालात मेसर्स एओव्ही इंटरनॅशनल एलएलपी तसेच शिलार कंपनीच्या सेवांमध्येही प्रथमदर्शनी दोष आल्याने फॉरेन्सिक अहवाल तातडीने प्राप्त करून संबंधित कंपनीलाही काळ्या यादीत टाकण्याची कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
सर्व रुग्णालयांचे फायर ऑडिट तीन महिन्यांत पूर्ण करा
राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि महानगरपालिका आयुक्तांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील सर्व रुग्णालयांचे विद्युत व अग्निसुरक्षा ऑडिट तीन महिन्यांच्या आत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सार्वजनिक तसेच खासगी रुग्णालयांमध्ये फायर ऑडिटची अंमलबजावणी, देखरेख आणि अनुपालन अहवाल सादर करण्याची जबाबदारी जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या माध्यमातून सुनिश्चित करण्याच्या सूचनाही आरोग्य सेवा आयुक्तांना देण्यात आल्या आहेत.
चौकशीत आलेल्या त्रुटी
व्हेंटिलेटरची वेळोवेळी आवश्यक देखभाल व दुरुस्ती न होणे.
फायर अलार्म व प्रिंकलर यंत्रणा कार्यान्वित नसणे.
फायर पंप हाऊस कुलूपबंद स्थितीत असणे
उपकरणांच्या देखभाल व तांत्रिक तपासणीत दोष.
























































