सरकारने हात वर केल्यामुळे मराठा आंदोलक आक्रमक, उमरग्यात तहसीलदाराची खुर्ची जाळली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आम्ही मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत. परंतु त्यांचे समाधान होत नाही. त्यामुळे आता आंतरवालीत सरकारचे शिष्टमंडळ जाणार नाही, असे म्हणत सरकारने हात वर केल्यामुळे मराठा आंदोलक संतप्त झाले आहेत. नांदेड जिल्हय़ात हदगाव येथे मराठा आंदोलकांनी मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांचे बॅनर फाडले, तर धाराशिव जिल्ह्यात उमरगा येथे तहसीलदाराची खुर्ची जाळण्यात आली.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे गेल्या बारा दिवसांपासून आंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसले आहेत. सरकार आणि जरांगे यांच्यात चर्चेच्या अनेक फेऱया झाल्या. परंतु उपोषणावर तोडगा निघाला नाही. अखेर सरकारने आम्ही सर्व मागण्या मान्य केल्या आहेत, जरांगे यांनी उपोषण सोडावे अशी भूमिका घेतली. सरकारचे शिष्टमंडळ जरांगेंकडे जाणार नाही असेही सरकारने स्पष्ट केले. सरकारने हात वर केल्यामुळे मराठा आंदोलकांमध्ये तीव्र असंतोष आहे. हदगाव येथे मराठा आंदोलकांनी घोषणाबाजी करत मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे बॅनर फाडले. हदगाव तालुक्यातील बरडशेवाळ येथेही मराठा आंदोलकांनी तीन तास रास्तारोको केला. यामुळे बराच काळ वाहतूकीचा खोळंबा झाला. याप्रकरणी चौघांना ताब्यात घेण्यात आले.