
पुरार गावातील पुरातन वाघेश्वरी मंदिराचा समावेश संजय गांधी पर्यटन स्थळामध्ये करण्यात यावा, अशी मागणी शिवसेनेच्यावतीने वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडे करण्यात आली आहे. मंदिरात येणा-या भाविकांची गर्दी होत असेल तर या सर्व बाबीकडे लक्ष देत संजय गांधी उद्यानातील प्रशासनाने योग्य ती कार्यवाही करावी, अशा सूचना वनमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील वागेश्वरी मंदिर हे पुरातन मंदिर असून या भागात मुंबईतील विविध भागातून भाविक येथे दर्शनासाठी येतात. पुरार गावची ग्रामदेवता म्हणून या मंदिराचा नाव लौकिक आहे. त्यामुळे या मंदिराचा अंतर्भाव संजय गांधी उद्यान पर्यटन स्थळामध्ये करावा, अशी मागणी शिवसेना नेते – आमदार सुनिल प्रभू यांनी 26 जून 2026 रोजी वन मंत्री गणेश नाईक यांना लेखी पत्राद्वारे केली होती. या बाबत बुधवारी वनमंत्र्यांनी मंत्रालयात बैठक घेऊन या विषयावर चर्चा केली. यावेळी देवळात जाणारा रस्ता हा चांगल्या पद्धतीने करावा जेणेकरून कोणालाही त्रास होणार नाही, अशी मागणी आमदार सुनिल प्रभू यांनी केली. त्यावर वाघेश्वरी मंदिराचे सुशोभीकरण व रस्त्याचे काम सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार करावे अशा सूचना वनमंत्र्यांनी दिल्या. या बैठकीत वन विभागाच्या वतीने मिलिंद म्हैसकर, वन संरक्षक सरोजिनी पाटील, किरण शिंदे देखील उपस्थित होते.
























































