
जगाच्या सायकलिंग नकाशावर पुण्याचे नाव ठळकपणे उमटविण्याच्या दिशेने महाराष्ट्राने आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. 2032च्या यूसीआय रोड वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या यजमानपदासाठी पुण्याने सादर केलेल्या उमेदवारीची इंटरनॅशनल सायकलिंग युनियनच्या (यूसीआय) तीन सदस्यीय पथकाने 4 ते 6 सप्टेंबरदरम्यान प्रत्यक्ष पाहणी केली. प्रस्तावित रेस मार्ग, स्पर्धास्थळे, प्रारंभ व अंतिम ठिकाणे, निवासव्यवस्था, प्रेक्षक व्यवस्थापन आणि तांत्रिक सुविधांची पाहणी करून पुण्याची क्षमता तपासण्यात आली.
यूसीआयच्या पथकाने बालेवाडीतील श्री शिवछत्रपती क्रीडा संपुल, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसर, तसेच प्रस्तावित रेस मार्गाची पाहणी केली. ‘पुणे ग्रँड टूर’च्या आयोजनाचा अनुभव, उपलब्ध पायाभूत सुविधा आणि विविध यंत्रणांमधील समन्वय यामुळे जागतिक स्पर्धेचे यजमानपद सांभाळण्याची पुण्याची ताकद यूसीआयसमोर मांडण्यात आली.
महाराष्ट्राचे शिष्टमंडळ पॅनडाला जाणार
22 सप्टेंबरला पॅनडातील मॉण्ट्रियल येथे महाराष्ट्राचे उच्चस्तरीय शिष्टमंडळ पुण्याची अधिपृत दावेदारी सादर करणार आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, प्रधान सचिव रणजितसिंह देओल, क्रीडा आयुक्त दीपक सिंगला आणि क्रीडामंत्र्यांचे सचिव राजेश देशमुख यांचा त्यात समावेश आहे. पुण्याची संकल्पना, पायाभूत सुविधा, आयोजन क्षमता आणि महाराष्ट्र शासनाचे सहकार्य यांचे सादरीकरण केले जाणार आहे.

























































