
उत्तर प्रदेशातील बुलंदशहर येथे समाजवादी पक्षाच्या नियोजित सभेला प्रशासनाकडून परवानगी नाकारण्यात आल्याने पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. “लोकशाही मार्गाने होणाऱ्या राजकीय कार्यक्रमांना हे सरकार इतके का घाबरते?” असा सवाल उपस्थित करत, योगी सरकारकडून विरोधकांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. लखनौ येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
पत्रकार परिषदेत बोलताना अखिलेश यादव म्हणाले की, बुलंदशहरमधील सभेच्या परवानगीसाठी पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी जिल्हाधिकारी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे वारंवार पाठपुरावा केला होता. सुरुवातीला मैदानाच्या परवानगीचे आश्वासन देण्यात आले. मात्र नंतर श्रावण महिन्याचे कारण पुढे करत सभेची तारीख बदलण्यास सांगण्यात आले. प्रशासनाच्या सूचनेनुसार पक्षाने नवीन तारीख निश्चित करून फेरअर्ज सादर केला, तरीही अखेर सभेच्या मैदानाची परवानगी नाकारण्यात आली.
याशिवाय रिझर्व्ह पोलिस लाईनच्या मैदानावर हेलिकॉप्टर उतरवण्यासही प्रशासनाने नकार दिल्याचे अखिलेश यादव यांनी सांगितले. मैदानात पाणी साचल्याचे कारण देत प्रशासनाने हेलिपॅडची परवानगी नाकारली होती. मात्र अखिलेश यादव यांनी पत्रकार परिषदेत प्रत्यक्ष जागेचे व्हिडीओ आणि फोटो दाखवत प्रशासनाचा हा दावा फेटाळून लावला. “या मैदानावर कुठे पाणी साचले आहे ते दाखवा, इथे फिरण्यासाठी काय होडी आणावी लागणार आहे का?” असा खोचक टोला लगावत त्यांनी प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
लोकशाहीत विरोधकांचे हक्क अशा प्रकारे हिरावून घेण्याचे प्रकार क्वचितच पाहायला मिळतात, असे सांगत त्यांनी पत्रकारांवर होणाऱ्या कारवायांवरही निशाणा साधला. लोकांच्या समस्या मांडणाऱ्या पत्रकारांवर गुन्हे दाखल केले जात असून सरकारी शाळांमध्ये माध्यमांच्या प्रवेशावर बंदी घातली जात असल्याचा आरोप त्यांनी केला.



























































