आसाममध्ये वनविभागाची मोठी कामगिरी, गळ्यात अडकलेला भलामोठा टायर काढून वन्य हत्तीची केली सुटका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आसामच्या गोलाघाट जिल्ह्यातील मोरोंगी परिसरात गुरुवारी एका वन्य हत्तीच्या गळ्यात अडकलेला मोठा टायर काढण्यात वनविभागाच्या पथकाला मोठे यश आले आहे. वनविभागाचे अधिकारी आणि पशुवैद्यकीय पथकाने अथक प्रयत्नांनंतर या हत्तीची सुखरूप सुटका केली.

ANI ने दिलेल्या वृत्तानुसार, गुरुवारी सकाळच्या सुमारास मोरोंगी परिसरातील एका चहाच्या टपरीजवळ अन्नाच्या शोधात फिरत असलेला एक वन्य हत्ती आढळून आला होता. या हत्तीच्या गळ्यात एक मोठा टायर अडकला होता, ज्यामुळे तो अत्यंत त्रस्त दिसत होता. या घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी आणि पशुवैद्यकीय पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

हत्तीला कोणत्याही प्रकारची इजा न पोहोचवता आणि बचाव पथकातील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य देत ही मोहीम राबवण्यात आली. अनेक तासांच्या प्रयत्नांनंतर आणि अत्यंत सावधगिरी बाळगत वनविभागाच्या पथकाने हत्तीच्या गळ्यातील तो मोठा टायर सुरक्षितपणे बाहेर काढला व त्याची सुटका केली.