
उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये गंगा आणि यमुना नद्यांच्या पाणीपातळीत सातत्याने वाढ होत आहे. या वाढत्या पाणीपातळीचा परिणाम शहरातील अनेक भागांसह ऐतिहासिक आणि पर्यटन स्थळांवरही दिसून येत आहे. दरम्यान, यमुनेच्या काठावर असलेल्या प्रेरणा स्थळाला पुराच्या पाण्याने वेढा घातल्यावरून समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी भाजपला टोला लगावला आहे.
अखिलेश यादव यांनी X वर एक पोस्ट करत म्हटले आहे की, “नाव बदलणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी, अब्जावधी रुपये खर्च करून बांधलेल्या प्रेरणा स्थळाचे नाव बदलून प्रेरणा जल-स्थळ करा.” यासोबतच त्यांनी भाजप नेत्यांवर निशाणा साधत म्हटले की, “भ्रष्टाचारी भाजपवाल्यांना विनंती आहे की त्यांनी किमान आपल्या महापुरुषांशी तरी प्रामाणिक राहावे.”
दरम्यान, प्रयागराजमधील पुराची परिस्थिती सातत्याने गंभीर होत चालली आहे. यमुनेच्या काठावर नव्याने बांधलेल्या प्रेरणा स्थळातही पुराचे पाणी पोहोचले आहे. येथे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी, श्यामा प्रसाद मुखर्जी आणि अशोक सिंघल यांचे पुतळे बसवण्यात आले आहेत. वाढत्या पाणीपातळीमुळे पुराचे पाणी थेट या पुतळ्यांपर्यंत पोहोचले आहे.




























































