
गौरी-गणपतीच्या सणासाठी मुंबई आणि ठाणे परिसरातून शुक्रवारी एकाच दिवशी एसटीच्या 3028 बसगाडय़ा कोकणच्या दिशेने रवाना झाल्या. या गाडय़ांमधून जवळपास दीड लाख मुंबईकर कोकणात निघाले. त्यामुळे सायंकाळी मुंबई सेंट्रल, परळ, कुर्ला, बोरिवली येथील बसस्थानकांवर गणेशोत्सवाचा उत्साह होता. एसटी महामंडळाने यंदा नवीन लालपरी आणि जिजाऊ गाडय़ांची विशेष व्यवस्था केल्यामुळे मुंबईकरांचा आनंद द्विगुणित झाला.
लाडक्या गणरायाच्या उत्सवाला सोमवारपासून सुरुवात होत आहे. गणरायाच्या स्वागताची तयारी करण्यासाठी मुंबईकर चार दिवस आधीच गावी रवाना झाले. रेल्वेच्या तिकीट बुकिंगमध्ये निराशा झाल्याने यंदा तब्बल अडीच लाखांहून अधिक मुंबईकरांनी एसटीला पसंती दिली.
शुक्रवारी मुंबई आणि ठाण्यातील एसटीच्या सर्वच बसस्थानकांवर मुंबईकरांची गर्दी उसळली होती. नवीन लालपरी-2427 आणि जिजाऊ गाडय़ा- 601 अशा एकूण 3028 गाडय़ा कोकणच्या दिशेने रवाना झाल्या. या गाडय़ांमधून दीड लाख मुंबईकरांनी सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगडमधील आपल्या गावचा प्रवास सुरू केला. मुंबईकरांची विक्रमी गर्दी लक्षात घेत एसटी महामंडळाने आपल्या आगारांमध्ये तसेच बसस्थानकांवर विविध सुविधांची उपलब्धता केली. अनेक स्वयंसेवी संस्थांनीही मुंबईकरांच्या सुखकर प्रवासासाठी ठिकठिकाणी सेवा दिली.
आज 2425 बस कोकणात जाणार
अनेक चाकरमानी ‘विकेण्ड’च्या सुट्टीचे नियोजन करून गाव गाठणार आहेत. त्यानुसार एसटीचे आरक्षण केलेल्या 2425 बसगाडय़ा शनिवारी कोकणातील जिह्यांत जाणार आहेत. या गाडय़ांमध्ये लालपरी 2149, तर जिजाऊ गाडय़ा 276 असणार आहेत.
रेल्वे स्थानकांत तुडुंब गर्दी
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रेल्वेने 386 गणपती विशेष गाडय़ांची व्यवस्था केली आहे. यामध्ये नियमित गाडय़ांव्यतिरिक्त मध्य रेल्वेच्या 258, पश्चिम रेल्वेच्या 64, कोकण रेल्वेच्या 58 आणि दक्षिण मध्य रेल्वेच्या 6 विशेष गाडय़ा पकडण्यासाठी रेल्वे स्थानकांवर गर्दी होत आहे.
कोकणात जाण्यासाठी ‘एसटी’चा ताफा
मुंबईतून कोकणात जाणाऱया मुंबईकरांसाठी एसटी महामंडळाकडून शेकडो बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. यामध्ये कुर्ल्याच्या नेहरूनगर डेपोत कोकणात जाण्यासाठी सज्ज असल्याच्या एसटी गाडय़ा.




























































