
भिवंडी-वाडा-मनोर राज्य महामार्गाच्या सिमेंट काँक्रिटीकरणाच्या कामात वाडा तालुक्यातील कुडूस नाका येथील अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणांचा विळखा पडला आहे. ही अतिक्रमणे काढण्याऐवजी कुडूस नाक्याच्या रुंदीकरणात शिंदे गटाचे भिवंडी ग्रामीणचे आमदार शांताराम मोरे यांनी खोडा घातला आहे. शांताराम मोरे यांनी व्यापाऱ्यांना पाठीशी घालून रस्त्याची रुंदी कमी करण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाम विभागाला दिल्याने कुडूस परिसरातील ५२ गावांतील नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
भिवंडी-वाडा-मनोर राज्य महामार्गाच्या सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम ईगल इन्फ्रा इंडिया लिमिटेड या कंपनीमार्फत केले जात आहे. रुंदीकरणात अडथळा ठरत असलेल्या कुडूस नाक्यावरील मालमत्ताधारकांना सार्वजनिक बांधकाम खात्याने नोटीस बजावून आठ दिवसांत अनधिकृत बांधकामे न हटवल्यास या बांधकामावर हातोडा चालवण्याचा इशारा दिला आहे. या नोटीसनंतर आमदार शांताराम मोरे यांनी नॅशनल इंग्लिश स्कूलच्या सभागृहात व्यापारी संघटना व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी तसेच ईगल इन्फ्रा कंपनीचे अधिकारी यांच्यासोबत बैठक घेतली. यावेळी त्यांनी चक्क रस्त्याची रुंदी कमी करण्याचे तोंडी आदेश सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले. शांताराम मोरे अनधिकृत बांधकामधारकांची बाजू घेऊन रूंदीकरणाला विरोध करत असल्याचे समजताच कुडूस परिसरातील ५२ गावांतील नागरिकांनीही तीव्र नाराजी व्यक्त केली.




























































