यूट्यूबवरील जाहिरात पाहून सुका मेवा मागवणे हापूरमधील एका निवृत्त हवाई दल अधिकाऱ्याला चांगलेच महागात पडले आहे. सायबर फसवणूक करणाऱ्यांनी विविध कोड वापरून आणि पैशांचा परतावा देण्याच्या नावाखाली फसवणूक करत त्यांच्या बँक खात्यातून तब्बल 84 हजार 325 रुपये लांबवले आहेत. याप्रकरणी पीडित व्यक्तीच्या तक्रारीवरून हापूर ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे.
उत्तर प्रदेशातील कृष्णनगरचे रहिवासी आणि भारतीय हवाई दलातून निवृत्त झालेले फ्लाइंग ऑफिसर नरेंद्र कुमार गोस्वामी यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी 29 जून रोजी यूट्यूबवर ‘श्रीराम ड्राय फ्रुट्स’ची एक जाहिरात पाहिली होती. या जाहिरातीच्या आधारे त्यांनी प्रत्येकी एक किलो बदाम, मनुका आणि काजू मागवले आणि फोनपेच्या माध्यमातून 1080 रुपये भरले. त्यानंतर 2 जुलै रोजी त्यांनी पुन्हा ती जाहिरात पाहिल्यानंतर त्यावरील क्रमांकावर संपर्क साधला. यावेळी फोन करणाऱ्या व्यक्तीने आपली ओळख राजेश देवान अशी सांगितली आणि जीएसटीच्या समस्येचे कारण पुढे करत 1080 रुपये परत करण्याची तयारी दर्शवली.
यादरम्यान भामट्याने पेमेंट आणि रिफंड देण्याच्या बहाण्याने विविध कोड पाठवून नरेंद्र कुमार गोस्वामी यांना वेळोवेळी पैसे जमा करण्यास भाग पाडले. असे त्यांच्या बँक खात्यातून एकूण 84 हजार 325 रुपये परस्पर काढून घेण्यात आले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी तात्काळ सायबर सेलशी संपर्क साधून 1930 क्रमांकावर तक्रार दाखल केली, ज्याचा तक्रार क्रमांक 33107260155473 असा आहे. याशिवाय एसबीआयच्या हेल्पलाइनवरही याची तक्रार नोंदवण्यात आली. याप्रकरणी हापूर ग्रामीण पोलिसांनी आरोपी राजेश देवान याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला असून पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.























































