चर्चेचा दरवाजा बंद करून बसणे हे चांगल्या राज्यकर्त्याचं लक्षण नाही, जरांगे यांच्या आंदोलनावरून संजय राऊत यांची फडणवीस सरकारवर टीका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मनोज जरांगे-पाटील यांना मुंबईत येण्यापासून आणि आंदोलन करण्यापासून रोखता येणार नाही, असे मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्ट केले. मात्र आंदोलनाची परवानगी घेणे बंधनकारक असल्याचे न्यायालयाने म्हटले. न्यायालयाचा हा निर्णय कळला नाही. आंदोलन करण्यापासून रोखता येणार नाही, पण परवानगीशिवाय आंदोलन करू नका असे न्यायालय म्हणते. परवानगी कुणाची, तर सरकारची. मग आंदोलनाचा हक्क आणि अधिकारा राहिला कुठे? न्यायालय सरकारच्या वर असून त्यांनी स्पष्ट करायला हवे होते की जरांगे यांना आंदोलनाचा पूर्ण अधिकार आहे. सरकारने त्यांच्या आंदोलनाची जबाबदारी घ्यावी आणि योग्य जागा द्यावी. पण सरकार काय सांगते आणि न्यायालयाची भाषा आम्हाला कळत नाही, असे शिवसेना नेते, खासदार संजय राऊत शनिवारी माध्यमांशी बोलताना म्हणाले.

मनोज जरांगे-पाटील यांच्यासोबत चर्चेचे दरवाजे बंद केल्यावरून संजय राऊत यांनी फडणवीस सरकारवर टीका केली. मनोज जरांगे ऐन गणपतीत मुंबईत आले तर मुंबईकरांना प्रचंड त्रास होईल. ज्या भागात त्यांचे आंदोलन असते त्या भागात गणेशोत्सवर मोठ्या प्रमाणात असतो. गणेशोत्सवात अडथळा यावा अशी त्यांची अजिबात इच्छा नाही, पण सरकार त्यांना मजबूर करत आहे. सरकार चर्चेचा दरवाजा बंद करून बसले आहे. चर्चेचा दरवाजा बंद करून बसणे हे चांगल्या राज्यकर्त्याचे लक्षण नाही. पण दरवाजा बंद करून बसण्याची ही परंपरा गेल्या 10-12 वर्षांत मोदी-फडणवीस यांनी आणलेली आहे.

जरांगेंना थांबवता येणार नाही, प्रत्येकाला आंदोलन करण्याचा अधिकार; हायकोर्टाचे निरीक्षण

मनोज जरांगे हे गेल्या 13 दिवसांपासून उपोषण करत आहेत. त्यांचे कार्यकर्ते रस्त्यावर आहेत. त्यांच्याशी चर्चा व्हायला हवी. चर्चेतून समाधान निघेल की नाही हे कुणीही सांगू शकत नाही. तरीही चर्चेचा दरवाजा बंद करू नये आणि सरकारच्या प्रमुख लोकांनी विश्वास निर्माण होईल अशी चर्चा करावी, असेही संजय राऊत म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, मनोज जरांगे हे समंजस नेते असून त्यांना आम्ही नक्कीच आवाहन करू. पण जबाबदारी सरकारची असून त्यांच्याशी चर्चा करून ते आहे तिथेच बैठक घ्यायला हवी आणि ते शक्य आहे. पण सगळे आता अहंकारात बुडालेले आहेत. राज्याचे मुख्यमंत्री म्हणतात, कुणी मेला, गेला तरी मला फरक पडत नाही. अशा मानसिकतेत ते आहेत. लंडनमध्ये जे सरकार फिरतेय, ते म्हणतात, मला शिव्या घातल्या. मी बोलणार नाही आणि सुनेत्रा पवार यांचा संबंधच येत नाही.

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी अठरा पगड जातींना एकत्र करून मराठी माणसाची भक्कम एकजूट उभारली. 92 कुळी-96 कुळी, ब्राह्मण-ब्राह्मणेतर, घाटी-कोकणी हे सगळए वाद गाडून त्यांनी मराठी माणसाची भक्कम एकजूट उभारली आणि मराठी म्हणून न्याय देण्याचा प्रयत्न केला. ही एकजुटीची वज्रमूठ अमित शहांनी फोडली. या सगळ्याला शहा-फडणवीस यांचे जातीय राजकारण जबाबदार आहे. महाराष्ट्र यांच्या राजकारणामुळे जाती-पातीत आणि पोटजातीत फाटला गेला, असेही संजय राऊत यावेळी म्हणाले.