
राजधानी दिल्लीत 18 वी ब्रिक्स शिखर परिषद आजपासून सुरू होणार आहे. दोन दिवस चालणाऱ्या या शिखर परिषदेसाठी राजधानी दिल्लीत जोरदार तयारी करण्यात आली आहे. ब्रिक्समध्ये 11 प्रमुख विकसनशील देश सहभागी होणार असून चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग दिल्लीत दाखल झाले आहेत.
ब्रिक्स परिषदेच्या निमित्ताने तब्बल सात वर्षांनंतर ते हिंदुस्थानात आले असून केंद्रीय राज्यमंत्री जितिन प्रसाद यांनी विमानतळावर त्यांचे स्वागत केले. शी जिनपिंग यांच्या हिंदुस्थान दौऱ्यामुळे हिंदुस्थान-चीन संबंधांमध्ये नव्या घडामोडींना सुरुवात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
याचपार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी संध्याकाळी शी जिनपिंग यांच्यासोबत द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. या चर्चेत व्यापार आणि गुंतवणूक संबंध अधिक मजबूत करण्यावर विशेष भर राहण्याची शक्यता आहे. शी जिनपिंग यांच्यासोबत सरकारी अधिकारी तसेच चीनमधील प्रमुख व्यावसायिक नेत्यांचा उच्चस्तरीय शिष्टमंडळही आले आहे.
ब्रिक्स शिखर परिषदेत चीनसोबतच ब्राझील, मिस्र, इथियोपिया, इंडोनेशिया, हिंदुस्थान, इराण, रशिया, सौदी अरब, दक्षिण आफ्रिका आणि संयुक्त अरब अमिरात या देशांचा समावेश आहे. ‘ब्रिक्स’ परिषदेच्या पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये कडेकोट सुरक्षा ठेवण्यात आली आहे. सुमारे 15 हजारहून अधिक दिल्ली पोलीस आणि निमलष्करी दलाच्या 200 तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. ‘ब्रिक्स’ परिषदेसाठी दिल्ली बंद राहणार नसली तरी मात्र ‘व्हीव्हीआयपीं’च्या ताफ्यांच्या हालचालींच्या वेळी काही मार्गांवर वाहतूक तात्पुरती थांबवण्यात येईल.
दिल्लीत आजपासून ब्रिक्स परिषद; कडेकोट सुरक्षा, 15 हजार पोलीस, निमलष्करी दलाच्या 200 तुकड्या तैनात
























































