
>> गौरी साळवेकर
सजीवतेचा उगम झाला आणि त्यासोबत जन्माला आली ती मानवी आयुष्याबद्दलच्या न संपणाऱया प्रश्नांची मालिका. पाश्चात्य तत्त्वज्ञानातील ऍडम आणि इव्ह यांनी ‘ते’ पहिलं सफरचंद खाल्लं व प्रोमेथिअसने देवांकडून अग्नी खेचून आणला किंवा आपल्याकडे ‘भगीरथाने गंगेला पृथ्वीवर आणलं’ या क्रांतिकारक कथांनी कित्येक सुजाण माणसांना मानवी जीवनातील इतिहासाचा आणि भवितव्याचा वेध घेण्याची प्रेरणा दिली, पण ज्या क्षणी माणसाच्या मनात ‘का?’ हा प्रश्न निर्माण झाला त्याक्षणी आपल्या आयुष्यात विज्ञानाचा प्रवेश झाला असं मानायला हरकत नाही.
एका पावसाळी कुंद हवेच्या दुपारी एक सहावीतली मुलगी एक पुस्तक वाचून अंतर्बाह्य झपाटून गेली आणि तिचं जीवितध्येय तिथेच निश्चित झालं. ती मुलगी होती आताची नोबेल विजेती शास्त्रज्ञ जेनिफर डोडना आणि ते पुस्तक होतं जेम्स वॅटसन यांचं ‘डबल हेलिक्स.’ आपल्याला डीएनए आणि त्याचं कार्य याबद्दल थोडीफार कल्पना असते. मात्र त्याचाच जुळा भाऊ आरएनए हा महारेणू, त्याची रचना, आकार आणि कार्य यांची जीवशास्त्राrय घडामोडींत किती महत्त्वाची भूमिका आहे याची काहीही माहिती आपल्याला-अगदी विज्ञानाच्या विद्यार्थ्यांनादेखील नसते.
वॉल्टर आयझॅक्सन लिखित आणि प्रा. माधुरी शानभाग अनुवादित ‘द कोड ब्रेकर’ या पुस्तकातून जनुक संपादन आणि मानवजातीचे भवितव्य या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर जेनिफर डोडना हिने केलेलं उत्तुंग कार्य सामान्य जनतेसमोर मांडण्याचं मोठं काम लेखक आणि अनुवादक यांनी केलं आहे. डोडनाचं बालपण, शिक्षण, जीवनध्येय आणि कोविड काळातील तिचं ‘क्रिस्पर’ तंत्रज्ञानातील अतुलनीय कार्य यांची उत्कृष्ट सांगड घातली आहे. मानवी आयुष्याचा सेतू जीव-रसायनशास्त्राशी जोडण्यात हे पुस्तक अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतं. जनुकतंत्र, प्रयोगशाळा, विज्ञान क्षेत्रातील अत्यंत मानाचे ‘सायन्स’ हे नियतकालिक, संशोधनाचे व्यावसायिकीकरण, पेटंट्स येण्यापूर्वी संशोधन चोरले जाण्याचा सततचा धोका, बायोहॅकिंग आणि सरतेशेवटी त्या संशोधनाची सामान्य माणसाला असणारी उपयुक्तता- ज्याला संशोधक ‘फ्रॉम बीकर टू बेडरूम’ असं संबोधतात त्याबद्दल अतिशय रंजक, ज्ञानवर्धक आणि मुख्य म्हणजे वस्तुनिष्ठ माहिती या पुस्तकातून मिळते.
आज पोलिओ निर्मूलन मोहीम, कोविड लस यांमुळे आपल्याला ‘प्रतिबंधात्मक शास्त्र’ म्हणजे काय हे ठाऊक आहे, परंतु आवाक्यात न येणारे रोग किंवा जनुकजन्य विकार-हिमोफिलिया, सिकल सेल, कॅन्सर इ. यांवर आपल्याला अजूनही मात करता आलेली नाही. ही मात आपण ‘जीन एडिटिंग’ – म्हणजे चक्क जनुकांमध्ये सूक्ष्म बदल करून कशी करू शकतो ही या पुस्तकातली सगळ्यात थरारक माहिती आहे. यामुळे आपण निसर्गात ढवळाढवळ करत आहोत का हा प्रश्न नक्कीच उपस्थित होत असला तरी यामुळे कित्येक दुर्दैवी जिवांचे, नव्हे पुढच्याही पिढय़ांचे जगणे कायमस्वरूपी सुकर होणार आहे हे विसरून चालणार नाही.
जगभर गाजलेल्या लिओनार्दो द विंची आणि स्टीव्ह जॉब्ज या पुस्तकाचे लेखक वॉल्टर आयझॅक्सन यांच्या लेखणीतून साकारलेलं हे पुस्तक म्हणजे डोडनाची, तिच्या अथक प्रयत्नांची आणि संशोधनाची गाथा आहे. विज्ञानावर लिहिलेलं अजून एक पुस्तक म्हणून याकडे बघता येणार नाही. ही मानवी जीवनाची, माणसाच्या बुद्धीची आणि विवेकाची एक सशक्त कथा आहे.
माधुरी शानभाग यांनी अतिशय क्लिष्ट विषयाचा ओघवत्या अत्यंत सुगम भाषेत अनुवाद केला आहे. विज्ञाननिष्ठ समाज ही सामूहिक जबाबदारी आहे याचे भान अशा साहित्याने निर्माण होते. केवळ विज्ञान अभ्यासक किंवा विद्यार्थी नव्हे तर विज्ञानाबद्दल कुतूहल असणाऱया प्रत्येकाला हा अनुवाद संग्रही ठेवावासा वाटेल याची खात्री वाटते.
कोड ब्रेकर
लेखक ः वॉल्टर आयझॅक्सन
अनुवाद ः प्रा. माधुरी शानभाग
प्रकाशक ः साकेत प्रकाशन, छत्रपती संभाजीनगर
पृष्ठसंख्या ः 542
किंमत ः 599 रुपये

























































