
>> शुभांगी बिंदू – रानडे
सुझन केन यांच्या अतिशय गाजलेल्या ‘क्वाएट’ या इंग्लिश पुस्तकाचा मराठी अनुवाद नुकताच वाचनात आला. समाजातल्या व्यक्तीच्या एका अशा पैलूवर हे पुस्तक प्रकाश टाकते ज्या पैलूला काहीसं हिणकस, कमी महत्त्वाचं, दुर्लक्ष करण्याजोगं समजण्याची प्रथा आहे – शांत, गंभीर, अबोल, अंतर्मुखी असणं. आपल्याला समाजात अशी पुष्कळ माणसं दिसतात – अबोल आणि अंतर्मुख. जोरजोरात, उत्साहानं सतत बोलणाऱया बहिर्मुख व्यक्तींच्या तुलनेत या व्यक्ती अगदी फिक्या वाटतात, हो ना? पण हे खरं आहे का? खरंच का या व्यक्ती दुर्लक्ष करण्याजोग्या, कमी महत्त्वाच्या असतात? मुळीच नाही – वस्तुस्थिती अशी मुळीच नाही. हे या कसदार पुस्तकातून आपल्यासमोर उलगडून दाखवण्यात आलेलं आहे.
पश्चिमात्य, विशेषत अमेरिकन समाजात अत्यंत बोलक्या, आपल्या कल्पना सर्वांसमोर प्रभावीपणे मांडू शकणाऱया आणि उत्साही लोकांनाच आदर्श व्यक्तिमत्त्व समजलं जातं. प्रत्यक्षात ते खरं असतंच असं नाही. याची जाणीव करून देताना अबोल, अंतर्मुख समजल्या गेलेल्या; पण आपल्या कार्यामुळे जगात अत्यंत समर्थपणे बदल घडवून आणू शकलेल्या अनेक शास्त्रज्ञ, विचारवंत, कलाकार यांची उदाहरणं लेखिका देते. आपलं व्यक्तिमत्त्व मुळात कसं आहे, अंतर्मुख की बहिर्मुख हे ओळखण्याची काही सूत्रं या पुस्तकात मिळतात. अत्यंत दिमाखदार भाषेत, चटपटीतपणे आपल्या व्यक्तिमत्त्वाने इतरांना भारून टाकत सांगितल्या गेलेल्या गोष्टी तेवढय़ा सकस असतीलच याची काही खात्री नाही आणि अबोलपणे, एकांतात राहून काम करणाऱया व्यक्तीने सांगितलेल्या गोष्टी टाकाऊच असतील असं तर मुळीच नाही, असं लेखिका अनेक उदाहरणं देऊन सिद्ध करते.
बहुतेक संशोधक आणि कलाकार, एकांतातच आपल्या सृजनाचा सर्वोत्तम आविष्कार घडवू शकतात आणि नंतर तो जगासमोर आणला जातो, असं सुझन केन म्हणतात. माणूस एकांतात असतानाच आपल्या मनाचा तळ गाठू शकतो, विचार करू शकतो, असं सांगतानाच, बहिर्मुख व्यक्ती हे काय अंतर्मुखी व्यक्तीच्या ताकदीने करू शकत नाहीत, हेही त्या स्पष्ट करतात. सर्जनशीलतेसाठी झ्देहत् एज्म अर्थात व्यक्तिगत अवकाश अत्यावश्यक असतो, त्याबरोबरच आजूबाजूच्या लोकांच्या दडपणातून सुटकाही आवश्यक असते. या दोन्ही गोष्टी अंतर्मुख व्यक्ती सहजच साध्य करू शकतात, असं सुझन सांगतात.
सुझन यांचे हे विचार म्हणजे बहिर्मुख व्यक्तीच हुशार आणि यशस्वी असतात या आतापर्यंतच्या सर्वमान्य सिद्धांताला दिलेला छेद आहे. व्यक्ती अंतर्मुख ंिकवा बहिर्मुख का बनते, याचा जैविक आधार काय, हेही सुझन यांनी अतिशय विस्ताराने सांगितले आहे. आशियाई लोक अंतर्मुख, तर पाश्चिमात्य लोक बहिर्मुख असतात असे त्या नमूद करतात. हे सिद्ध करण्यासाठी त्या अभ्यासलेली आशियाई विद्यार्थ्यांची उदाहरणं देतात. अनेक आशियाई देशांतल्या पारंपरिक म्हणी आणि वाक्प्रचार सांगतात आणि त्याचबरोबर पाश्चिमात्य समजही उद्धृत करतात ः आपल्यासमोर चित्र स्पष्ट होतं ः खरोखरच आशियाई समाज अंतर्मुख आणि पाश्चिमात्य समाज बहिर्मुख असतात. या ओघातच त्या आशियातून पश्चिमी देशांत स्थलांतरित झालेल्या विद्यार्थ्यांना, आदर्श व्यक्तिमत्त्वाबाबतच्या विरूद्ध कल्पनांमुळे कशा समस्यांना तोंड द्यावे लागते त्याचाही ऊहापोह करतात. दोन्ही समाजांच्या विचारधारणां मधले चांगले ते वेचून वाचकांसमोर ठेवतात. पुस्तकातून आपल्याला, अंतर्मुख आणि बहिर्मुख व्यक्तींमधले फरक, त्यांना मिळणाऱया आदरातले फरक दाखवून देतात. त्याचबरोबर खरे कर्तृत्व, सर्जनशीलता, संशोधन हे अंतर्मुखी व्यक्तींकडेच जास्त असते असेही त्या पटवून देतात.
या पुस्तकाच्या वाचनानंतर अबोल, एकलकोंडय़ा आणि बुजऱया व्यक्तींकडे पाहण्याचा आपला पूर्वापार दृष्टिकोन बदलून जातो, हे मात्र खरे. अंतर्मुख विद्यार्थी आणि त्यांचे पालक, त्यांच्यासाठी अनेक बहुमूल्य सल्ले केन यांनी या पुस्तकातून दिले आहेत. अंतर्मुखी व्यक्तींचा सेल्फ रिस्पेक्ट जोमदारपणे वाढेल, असं विवेचन केन यांनी ‘क्वाएट’ या पुस्तकातून केलं आहे. याहीवेळी कसदार विषयांवरची पुस्तकं मराठीतून उपलब्ध करून देण्याची सकस परंपरा साकेत प्रकाशनानं जपली आहे आणि व्यंकटेश उपाध्ये यांनी अगदी समर्थपणे हे इंग्रजी पुस्तक मराठीत अनुवादित केले आहे. अंतर्मुखी व्यक्तींकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन कायमस्वरूपी बदलणारे हे पुस्तक खरोखर सर्वांनी वाचावे असेच आहे.
क्वाएट
लेखिका ः सुझन केन
अनुवाद ः व्यंकटेश उपाध्ये
प्रकाशक ः साकेत प्रकाशन, छत्रपती संभाजीनगर पृष्ठ संख्या ः 296
किंमत ः रु. 399/-

























































