
बिहारमधील भीषण पूरस्थितीवरून राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी शनिवारी केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. राज्याची तिजोरी रिकामी पडली असून केंद्र सरकार बिहारशी दुजाभाव करत असल्याचा आरोप करत, पूरग्रस्त कुटुंबांसाठी केंद्राने विशेष आर्थिक पॅकेज द्यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
पत्रकारांशी बोलताना तेजस्वी यादव म्हणाले की, “सरकारने पूरग्रस्तांसाठी विशेष पॅकेज दिले पाहिजे. केंद्र सरकार बिहारशी सातत्याने दुजाभाव करत आहे, तर दुसरीकडे राज्याची तिजोरी रिकामी झाली आहे. आम्ही सातत्याने पूरग्रस्तांच्या भेटी घेत असून, त्यांना कोणत्याही मूलभूत सुविधा मिळत नसल्याचे विदारक चित्र आहे. पूरग्रस्तांना अक्षरशः त्यांच्या हालअपेष्टांवर सोडून देण्यात आले आहे.”
उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये गंगा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने गंभीर पूरस्थिती निर्माण झाली आहे. बहुतांश ठिकाणी पाणीपातळी कमी होत असली तरी, ग्राउंड लेव्हलवरील परिस्थिती अद्यापही भीषण आहे. बिहार जलसंपदा विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बक्सर, दिघाघाट, गांधीघाट, हाथीदह, सुलतानगंज आणि भागलपूरमध्ये गंगेच्या पाणीपातळीत किंचित घट झाली आहे. तसेच पुनपुन आणि सोन नदीची पातळीही खालावली आहे. मात्र, पाणी ओसरत असले तरी पुराचा फटका बसलेल्या नागरिकांच्या अडचणी अद्यापही कायम आहेत.
भागलपूरमध्ये गंगेच्या पुराचे पाणी राष्ट्रीय महामार्ग-८० आणि एका चौपदरी रस्त्यावर आल्याने प्रशासनाने सुरक्षेच्या कारणास्तव हा मार्ग दोन्ही बाजूंनी बॅरिकेड्स लावून बंद केला आहे. पुरामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून प्रशासनाकडून पाणीपातळी आणि परिस्थितीवर लक्ष ठेवले जात आहे. दरम्यान या पुरामुळे राज्यात जीवितहानीलाही सुरुवात झाली आहे. भागलपूर जिल्ह्यातील कोयली खुताहा गावात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात पडून चार मुलांसह पाच जणांचा बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी उघडकीस आली.
























































