
Women’s Asia Cup T20 स्पर्धेत टीम इंडियाने वर्चस्व गाजवलं. स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी केली आणि हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात हिंदुस्थानने आठव्यांदा आशिया चषक उंचावला. टीम इंडियाच्या खेळाडूंनी केलेल्या या धडाकेबाज कामगिरीचा परिणाम ICC च्या ताज्या महिला टी-20 क्रमवारीत दिसून येत आहे.
हिंदुस्थानची फिरकीपटू श्री चरणी हिने कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट 804 रेटिंग गुणांसह महिला टी-20 क्रमवारीत आपले पहिले स्थान कायम ठेवले आहे. महिला टी-20 आशिया कपच्या अंतिम सामन्यात श्रीलंकेविरुद्ध 4 फलंदाजांना बाद करत तिने हा पराक्रम केला. हिंदुस्थानच्या वतीने फलंदाजी किंवा गोलंदाजीमध्ये कोणत्याही खेळाडूने मिळवलेले हे आजवरचे सर्वाधिक रेटिंग गुण ठरले आहेत. 2011 मधील मिताली राजचा 780 गुणांचा विक्रम मागे टाकला आहे. तसेच, ऑस्ट्रेलियन गोलंदाज मेगन शटच्या (नोव्हेंबर 2018) ऑल-टाइम उच्चांकापासून चरणी केवळ दोन गुण दूर आहे.
या क्रमवारीमध्ये हिंदुस्थानच्या इतर गोलंदाजांनीही उत्कृष्ट झेप घेतली आहे. आशिया कप स्पर्धेत सर्वाधिक 14 विकेट्स घेत बहरदार कामगिरी करणारी अष्टपैलू दीप्ती शर्मा चार स्थानांची कमाई करत थेट दुसऱ्या स्थानी पोहोचली आहे. याशिवाय, वेगवान गोलंदाज नंदानी शर्मा 94 व्या स्थानावर पोहोचली असून, लेगस्पिनर प्रेमा रावत हिने तब्बल 50 स्थानांची मोठी झेप घेत 96व्या स्थानी धडक मारली आहे.
फलंदाजी आणि अष्टपैलूंच्या क्रमवारीतही महिला खेळाडूंनी आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. स्पर्धेत सर्वाधिक 236 धावा करणारी सलामीवीर शफाली वर्माने सातव्यावरून सहाव्या स्थानावर झेप घेतली आहे, तर स्मृती मनधाना 745 गुणांसह पाचव्या स्थानी कायम आहे. फलंदाजीसोबतच शफालीने अष्टपैलूंच्या यादीतही पाच स्थानांची सुधारणा करत 15 वे स्थान पटकावले आहे.



























































