
देशभरात गणरायाचे मोठ्या भक्तिभावाने आगमन झाले आहे. सार्वजनिक मंडळामध्ये वेगवेगळ्या आकर्षक रुपात बाप्पाला मंडपात विराजमान करण्यात आले आहे. हैदराबादेतील बेगम बाजारातील फिलखानात विराजमान करण्यात आलेल्या बाप्पाची सध्या देशभर चर्चा आहे. या ठिकाणी बसवण्यात आलेल्या गणपती बाप्पाच्या मूर्तीला 24 कॅरेट सोन्याची प्लेटिंग करण्यात आली असून तब्बल 3.8 लाखांहून अधिक अमेरिकन डायमंडने सजवण्यात आले आहे.
या मूर्तीचे वजन 48 किलो असून ही मूर्ती तयार करण्यासाठी 8 महिने लागले आहेत. याला 8 कारागिरांनी मिळून तयार केले आहे. ही मूर्ती बनवताना केवळ गोल्ड प्लेटिंग आणि डायमंड्सचा वापर करण्यात आला नाही तर यात धार्मिक प्रतिके आणि बारीक डिझाईनचेही खास लक्ष ठेवण्यात आले आहे. गणेश मूर्ती साकारण्यासाठी पंचधातूचा वापर करण्यात आला आहे. मूर्तीच्या मागे दशावतार म्हणजेच भगवान विष्णूचे दहा अवतार दाखवण्यात आले आहेत. वरच्या बाजूला भगवान वेंकटेश्वर म्हणजेच तिरुपती बालाजीचे स्वरूप दाखवले आहे. धार्मिक आकृतींच्या प्रतिमेची गणेश मूर्ती आकर्षणाचे केंद्रबिंदू बनली आहे.

























































