
अमेरिका इस्रायलला 2.8 अब्ज डॉलर्स म्हणजेच जवळपास 26 हजार कोटी रुपये किमतीची शस्त्रास्त्रे पुरवण्याची तयारी करत आहे. या पॅकेजमध्ये 40 हजार विध्वंसक अवजड बॉम्बचा समावेश आहे. या प्रत्येक बॉम्बचे वजन 2,000 पाउंड म्हणजेच जवळपास 900 किलो इतके आहे. या बॉम्बचा पुरवठा याआधी जो बायडेन यांनी 2024 मध्ये थांबवला होता. परंतु, आता तोच पुरवठा ट्रम्प हे पुन्हा एकदा सुरू करणार आहेत.
इस्रायलला जी शस्त्रास्त्रे पुरवली जाणार आहेत त्यामध्ये 20,000 ‘एमके84’ बॉम्ब आणि 20,000 ‘ब्लू-117’ बॉम्बचा समावेश आहे. परंतु, या कराराला अद्याप अंतिम स्वरूप देण्यात आलेले नाही, असे सांगितले जात आहे. 2024 मध्ये तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या प्रशासनाने या 2,000 पाउंड वजनाच्या बॉम्बची एक खेप इस्त्रायलला पाठवण्यावर बंदी घातली होती. कारण, त्यांना अशी भीती वाटत होती की, गाझासारख्या दाट लोकवस्तीच्या भागात या बॉम्बचा वापर केल्यास मोठय़ा संख्येने जीवितहानी होऊ शकते. ट्रम्प प्रशासनाने गेल्या वर्षीच इस्रायलला जवळपास 3 अब्ज डॉलर्सच्या शस्त्रास्त्र विक्रीला मंजुरी दिली होती. यामध्ये 35,500 हून अधिक जड बॉम्बचा समावेश होता.

























































