मानखुर्द जकात नाक्यावर बिझनेस हब, पार्किंग, हॉटेल, शॉपिंग मॉल, व्यावसायिक गाळे; दोन हजार कोटी खर्चून 30 मजली इमारत बांधणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईच्या सीमेवर असणाऱ्या मानखुर्द जकात नाक्यावर पालिका दोन हजार कोटींची भव्य इमारत बांधून बिझनेस हब तयार करणार आहे. या ठिकाणी शॉपिंग मॉल, व्यावसायिक गाळे, पार्किंग हब, हॉटेल, कार्यालये, सीएनजी सेंटर इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन, फूड प्लाझा अशा सेवासुविधा उभारण्यात येणार आहेत.

मुंबई महापालिकेचे उत्पन्नाचे मुख्य स्रोत असलेले जकात नाके 2017 मध्ये बंद करण्यात आल्यानंतर आजपर्यंत दहिसर व मानखुर्द जकात नाके ओस पडले आहेत. त्यामुळे या दोन्ही जकात नाक्यांवर सोयीसुविधांसह थ्री स्टार फाईव्ह स्टार हॉटेल शॉपिंग सेंटर पार्किंग हब अशा सुविधा उपलब्ध करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. विशेष म्हणजे मुंबईतील वाहतूक कोंडी

फोडण्यासाठी आता देशभरातून येणाऱ्या पॅसेंजर गाड्यांना दहिसर व मानखुर्द चेक नाक्यांवरच रेड सिग्नल मिळणार आहे. या पॅसेंजर गाड्या या ठिकाणी हॉल्ट घेऊन पुन्हा परतीला जातील. तर इथून मुंबईत येण्यासाठी कनेक्टिव्हिटी वाहतूक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मानखुर्द जकात नाका बिझनेस हब प्रकल्पाचा आराखडा अंतिम टप्प्यात आहे. निविदा प्रक्रिया पुढील पाच ते सहा महिन्यांत पूर्ण होण्याची शक्यता असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.

पालिकेला मिळणार महसूल

प्रस्तावित केंद्रात सुमारे 350 बस आणि 1,200 ते 1,300 कार पार्किंगची क्षमता असेल. येथील सुविधा भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देण्यात येणार असून त्यातून महापालिकेला नियमित महसूल मिळण्याची अपेक्षा आहे. दरम्यान, मानखुर्द येथील जकात नाक्याच्या जागेवर पालिकेमार्फत वाहतूक आणि व्यावसायिक केंद्र प्रस्तावित आहे. अतिरिक्त आयुक्त प्राजक्ता वर्मा-लवंगारे यांनी मानखुर्द येथील या बहुविध वाहतूक आणि व्यावसायिक केंद्र स्थळास नुकतीच प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. तसेच, विविध निर्देश दिले. यावेळी सहआयुक्त  संजोग कबरे, उप आयुक्त संध्या नांदेडकर, प्रमुख वास्तुशास्त्रज्ञ उमेश नगरकर आदी उपस्थित होते.