ओव्हल, क्रॉस, आझाद मैदानातील खेळपट्ट्यांचे शुल्क वाढण्याची चिन्हे; वापरासाठी नवे धोरण, प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दक्षिण मुंबईतील आझाद मैदान, क्रॉस मैदान आणि ओव्हल मैदानातील खेळपट्टय़ांच्या वापरासाठी आता एकसंध आणि पारदर्शक धोरण तयार करण्यात येणार आहे. खेळपट्टय़ांच्या भाडेपट्टय़ांचे नूतनीकरण, भाडय़ाची पुनर्रचना, वापराचे नियम तसेच मैदानांचे नियंत्रण, व्यवस्थापन आणि संवर्धन याबाबत सर्वंकष धोरण निश्चित करण्यासाठी समिती स्थापन केली आहे.

क्रीडा विभागाचे प्रधान सचिव यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या समितीत सदस्य म्हणून क्रीडा आणि युवक सेवा आयुक्त, मुंबई शहर जिल्हाधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, क्रीडा विभागातील उपसचिव/अवर सचिव, क्रीडा आणि  युवक सेवा विभागाचे उपसंचालक तसेच मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष किंवा सचिव यांचा समितीत समावेश करण्यात आला आहे.  आझाद मैदान, क्रॉस मैदान आणि ओव्हल मैदानाच्या दीर्घकालीन व्यवस्थापनासाठी आर्थिकदृष्टय़ा व्यवहार्य, क्रीडाभिमुख आणि शाश्वत धोरण तयार करण्याबाबत शिफारशी करण्याची जबाबदारी समितीवर आहे. क्रीडा विभागाने आज यासंदर्भातील शासन निर्णय जारी केला.

खेळाडूंमध्ये नाराजीची शक्यता

मुंबईतील खेळाची मैदाने एकीकडे कमी होत चाललेली आहेत. क्रिकेटखेळाडूंची संख्या वाढत चाललेले आहे. सरावासाठी मैदाने कमी पडत आहेत. त्यातच खेळपट्टय़ांचे शुल्क वाढवल्यास क्रीडापटूंमध्ये मोठी नाराजी पसरण्याची चिन्हे आहेत.