
कांदिवलीतील नैसर्गिक तलावांमध्ये पैसे घेऊन पाच दिवसांच्या घरगुती गणपतींचे विसर्जन केले जात असल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सहा फुटांपेक्षा उंच गणेशमूर्तींचेच विसर्जन नैसर्गिक जलस्रोतात करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश असताना कांदिवली गावठाण तलाव, डिंगेश्वर तलाव आणि बंदर पाखाडी तलाव या नैसर्गिक तलावांवर भाविकांकडून घरगुती गणपतींसह मोठय़ा मूर्तीचे पैसे घेऊन विसर्जन केले जात असल्याचा आरोप मूर्तिकार वसंत राजे यांनी केला. यामध्ये भाविकांकडून घरगुती गणपती विसर्जनासाठी 200 ते 500 रुपये आणि मोठय़ा मूर्तींसाठी एक ते दीड हजार रुपयांची बेकायदेशीर वसुली केली जात असून हे सर्व पुरावे न्यायालयात सादर करणार असल्याचेही राजे यांनी सांगितले.

























































