
आशियाई क्रीडा स्पर्धेच्या हॉकी मैदानावर पहिल्याच दिवशी हिंदुस्थानच्या पुरुष आणि महिला संघाचे गोलतांडव अनुभवयाला मिळाले. महिला संघाने उझबेकिस्तानचा तब्बल 19-0 असा धुव्वा उडवला, तर पुरुष संघाने इंडोनेशियाला 13-1 अशा दणदणीत फरकाने नमवत आशियाई क्रीडा स्पर्धेत आपणच सुवर्ण धमाका करणार, याचा समस्त आशियाई संघांना इशारा दिला. एका दिवसात तब्बल 32 गोल झळकावत हिंदुस्थानी संघांनी आक्रमक हॉकीचे सर्वोत्तम प्रदर्शन साकारले. महिला संघाकडून दीपिका सेहरावतने एका सामन्यात आठ गोल ठोकत इतिहास रचला, तर पुरुष संघाकडून दिलप्रीत सिंहने चार गोलांची आतषबाजी करत हिंदुस्थानच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
महिलांचा 19-0 धडाका
उझबेकिस्तानविरुद्ध हिंदुस्थानी महिलांनी पहिल्या शिट्टीपासूनच गोलांचा पाऊस सुरू केला. पहिल्या अर्ध्यातच 8-0 अशी आघाडी घेतल्यानंतर उत्तरार्धात आणखी 11 गोलांची भर घालत त्यांनी सामना एकतर्फी केला. दीपिका सहरावतने तब्बल आठ गोल झळकावत आशियाई क्रीडा स्पर्धेतील हिंदुस्थानी महिला खेळाडूचा एका सामन्यातील सर्वोत्तम गोलविक्रम नोंदवला. इशिका चौधरीने तीन गोल करत दीपिकाला समर्थ साथ दिली, तर लालरेम्सियामी, बलजीत कौर, नेहा, नवनीत कौर, लथंतलुआंगी आणि साक्षी राणा यांनीही गोलांची नोंद केली. वेगवान पासिंग, अचूक फिनिशिंग आणि सततच्या आक्रमणामुळे उझबेकिस्तानला संपूर्ण सामन्यात सावरताही आले नाही व त्यांचा गोलांचा आकडा शून्यावरच राहिला.
पुरुषांचा 13-1 हल्लाबोल
गतविजेत्या हिंदुस्थानी पुरुषांनी इंडोनेशियाविरुद्ध तितक्याच आक्रमक शैलीत खेळ करत 13-1 असा विजय मिळवला. दिलप्रीत सिंहने चार गोलांची आतषबाजी केली, तर शिलानंद लाकरा आणि सुखजीत सिंह यांनी प्रत्येकी दोन गोल झळकावले. अभिषेक, राजिंदर सिंह, मनदीप सिंह, कर्णधार हरमनप्रीत सिंह आणि जुगराज सिंह यांनी प्रत्येकी एक गोल करत विजयाची उंची वाढवली. इंडोनेशियाकडून औलिया अल अर्ध याने एकमेव गोल केला. मात्र हिंदुस्थानी आक्रमणापुढे त्याचा काहीच प्रभाव पडला नाही. वेग, आक्रमकता आणि पेनल्टी कॉर्नरवरील अचूक अंमलबजावणीच्या जोरावर पुरुष संघानेही सुवर्ण मोहिमेचा इरादा पहिल्याच दिवशी स्पष्ट केला.






























































