
शफाली वर्माच्या वादळी शतकाच्या जोरावर हिंदुस्थानने बांगलादेशचा अक्षरशः पालापाचोळा करीत आशियाई क्रीडा स्पर्धेच्या महिला क्रिकेटमध्ये ‘शंभर नंबरी’ विजय मिळविला. 196 धावांच्या कठीण लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशचा 15.4 षटकांत केवळ 81 धावांत खुर्दा उडाल्याने हिंदुस्थानने 114 धावांनी बाजी मारत रुबाबात अंतिम फेरी गाठली. शफालीने अवघ्या 49 चेंडूंत नाबाद शतक ठोकत बांगलादेशच्या गोलंदाजांची दाणादाण उडवीत क्षेत्ररक्षकांनाही नुसते पुतळे बनविले होते. आता सुवर्णपदकासाठी हिंदुस्थानची गाठ अपेक्षेप्रमाणे श्रीलंकेशी पडणार आहे.
हिंदुस्थानी महिलांनी प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 4 बाद 195 धावांचा डोंगर उभा केला. शफालीने अखेरच्या चेंडूवर आपले पहिले आंतरराष्ट्रीय टी-20 शतक पूर्ण केले. तिच्या नाबाद 100 धावांच्या खेळीला तब्बल नऊ षटकार आणि तीन चौकारांचा साज होता. हिंदुस्थानला स्मृती मानधनाने धडाकेबाज सुरुवात करून दिली. अवघ्या 19 चेंडूंत 37 धावा करताना ती महिला टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारी फलंदाज ठरली. शफालीसोबत तिची सलामीची भागीदारी 36 चेंडूंत 72 धावांची झाली. शफालीने सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेत पहिल्या 17 चेंडूंत 34 धावा कुटल्या. यानंतर कर्णधार हरमनप्रीत कौरनेही सूर गवसल्याचे दाखवून दिले. सुरुवातीला संयमी खेळल्यानंतर तिने 33 चेंडूंत 40 धावा फटकाविल्या. शफाली आणि हरमनप्रीत यांनी तिसऱ्या विकेटसाठी 55 चेंडूंत तब्बल 94 धावांची भागीदारी करीत बांगलादेशच्या गोलंदाजांचे पंबरडे मोडले.
बांगलादेशचा डाव कोसळला
196 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशची सलामीची फलंदाज दिलारा अख्तरने सर्वाधिक 27 धावा केल्या. मात्र, तिला कुणाचीही साथ लाभली नाही. श्रीचरणीने निगार सुलतानाला बाद करत बांगलादेशची अवस्था 3 बाद 38 अशी केली. त्यानंतर बांगलादेशचा डाव टप्प्याटप्प्याने कोसळला.






























































