मुंबईच्या पाणीपुरवठ्यासाठी पिसे-पांजरपूर जलबोगद्याला सरकारची मंजुरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईच्या पाणीपुरवठ्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या पिसे ते पांजरापूरदरम्यान जलबोगदा उभारण्याच्या प्रकल्पाला राज्य शासनाने पूर्वमंजुरी दिली आहे. यामुळे मोठ्या प्रमाणावर होणारी पाणीगळती रोखली जाऊन मुंबईकरांचा पाणीपुरवठा सुरळीत होण्यास मदत होणार आहे आहे. मुंबई महापालिकेकडून नगरविकास विभागाकडे यासंदर्भात मंजुरी मागण्यात आली होती.

पिसे ते पांजरापूरदरम्यान सुमारे आठ किलोमीटर अंतरावर सध्या 2 हजार 235 मिमी. व्यासाच्या तीन आणि तीन हजार मिमी व्यासाच्या एका अशा एकूण चार जलवाहिन्यांद्वारे पाणी वाहून नेले जाते. या जलवाहिन्या अनुक्रमे 1979, 1986, 1996 आणि 2007 मध्ये कार्यान्वित करण्यात आल्या. त्यांचे सध्याचे वय अनुक्रमे 47, 40, 30 आणि 19 वर्षे आहे. मात्र या जलवाहिन्या जुन्या झाल्यामुळे यामधून होणाऱया पाणी वाहतूक व्यवस्थेवर मर्यादा येत होत्या. त्याचप्रमाणे हे पाणी वाहून नेण्यासाठी अतिरिक्त उदंचन केंद्राच्या बांधकामाची गरज होती. भविष्यातील पाण्याची मागणी तसेच विद्यमान जलवाहिन्यांच्या बाजूला उपलब्ध जागेची कमतरता या बाबी लक्षात घेऊन पिसे-पांजरापूरदरम्यान जलबोगदा उभारण्याचा प्रस्ताव महापालिकेकडून मांडण्यात आला होता. मुंबई महानगरपालिका अधिनियमानुसार सरकारने या जलबोगद्याचा आराखडा व बांधकाम करण्यास पूर्वमंजुरी दिली आहे.

इमारतींना धोका होणार नाही याची दक्षता

जलबोगद्याच्या खोदकामाच्या मार्गातील इमारती व वास्तूंना कोणताही धोका पोहोचणार नाही, याची खातरजमा करण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. खोदकामाच्या मार्गातील भूगर्भशास्त्राचा पूर्ण अभ्यास करूनच टनेल बोअरिंग मशीनची निवड करण्याची अट घालण्यात आली आहे. त्याचप्रमाणे प्रकल्पासाठी पर्यावरण, भूजल सर्वेक्षण तसेच केंद्रीय पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालय आणि अन्य संबंधित प्राधिकरणांच्या आवश्यक परवानग्या घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मुसळधार पावसामुळे जलबोगद्याचे बांधकाम सुरू असताना किंवा काम पूर्ण झाल्यानंतर आपत्कालीन परिस्थिती उद्भवू नये, यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याच्याही सूचना करण्यात आल्या आहेत. खोदकामामुळे होणारे धुळीचे प्रदूषण रोखण्यासाठी तसेच ध्वनी प्रदूषणाची तीव्रता 55 डेसिबलपेक्षा कमी राखण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश आहेत.