
घाटकोपर पश्चिम अमृत नगर येथील राजगड आणि रायगड सहकारी गृहनिर्माण सोसायटीचा रखडलेला पुनर्विकास लवकरच मार्गी लागणार आहे. गेल्या पंधरा वर्षांपासून हा प्रकल्प रखडवून ठेवलेल्या विकासकाकडून एसआरएने हा प्रकल्प काढून घेतला असून आता नव्याने विकासकाची नियुक्ती केली जाणार आहे. रहिवाशांनी विकासक म्हणून शिवशाही पुनर्वसन प्रकल्पाची नियुक्ती करावी, असा प्रस्ताव एसआरएला दिला आहे. एसआरएकडून मंजुरी मिळताच रखडलेला हा प्रकल्प तीन वर्षांत पूर्ण करण्याची तयारी शिवशाहीने दर्शवली असून त्यासाठी सुमारे 150 कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे.
घाटकोपर अमृतनगर येथील राजगड, रायगड सहकारी गृहनिर्माण सोसायटी अंतर्गत सुमारे तीनशे झोपडय़ा असून त्यांचा पुनर्विकास व्हावा म्हणून संबंधित झोपडीधारकांनी पंधरा वर्षांपूर्वी विकासकाची नियुक्ती केली होती. मात्र, काही कारणास्तव हा प्रकल्प पूर्ण होऊ शकलेला नाही. परिणामी गेल्या अनेक वर्षांपासून हे रहिवासी संक्रमण शिबिरात राहत आहेत. एसआरएने 13(2) अन्वये विकासकाकडून प्रकल्प काढून घेतला आहे. त्यानुसार शिवशाही पुनर्वसन प्रकल्पाची विकासक म्हणून नियुक्ती करावी, असा प्रस्ताव रहिवाशांनी एसआरएला दिला आहे, अशी माहिती शिवशाहीच्या एका वरिष्ठ अधिकाऱयाने दिली. बांधकाम आणि विकास संस्थेच्या (सी ऍण्ड डी) माध्यमातून हा प्रकल्प मार्गी लावला जाईल, असेही त्यांनी सांगितले.



























































