
बाजारात सध्या विविध सौंदर्यप्रसाधने आणि वैयक्तिक वापराच्या वस्तूमध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ आढळून येत आहेत. त्यामुळे नागरिकांना योग्य वस्तू निवडताना अनेक अडचणीं येत होत्या. मात्र आता केंद्र सरकारच्या नव्या नियमांमुळे साबण, शॅम्पू, टूथपेस्ट तसेच विविध सौंदर्यप्रसाधने आणि वैयक्तिक वापराच्या वस्तू खरेदी करताना ग्राहकांना आता त्या उत्पादनाचे स्वरूप सहज ओळखता येणार आहे. सरकारने पॅकेजिंगवरील लेबलिंगसंदर्भातील नियमांमध्ये बदल केला असून या उत्पादनांवर ते शाकाहारी आहेत की मांसाहारी, हे दर्शविणारे चिन्ह देणे बंधनकारक करण्यात आले आहे.
इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, केंद्र सरकारने Legal Metrology (Packaged Commodities) Rules, 2011 मध्ये सुधारणा केली आहे. हा बदल सोमवारपासून लागू करण्यात आला आहे. या नव्या नियमानुसार, शाकाहारी घटकांपासून तयार केलेल्या उत्पादनांच्या पॅकेजिंगवर हिरव्या रंगाचा ठिपका देणे बंधनकारक असेल. तर मांसाहारी घटकांपासून तयार केलेल्या उत्पादनांवर लाल किंवा तपकिरी रंगाचा ठिपका असणे आवश्यक असणार आहे.
शाकाहारी किंवा मांसाहारी दर्शवणारे चिन्ह उत्पादनांच्या पॅकेजिंगवर दर्शनी भागात छापावे लागणार आहे. जेणेकरून ग्राहकांना वस्तू निवडताना अडचणी येणार नाहीत. या नव्या नियमामध्ये साबण, शॅम्पू, टूथपेस्ट, सौंदर्यप्रसाधने आणि इतर टॉयलेटरीज यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे या वस्तूंच्या निर्मितीमध्ये वापरण्यात आलेल्या घटकांच्या स्वरूपाबाबत ग्राहकांना पॅकेजिंगवरूनच माहिती मिळू शकणार आहे.


























































