
सध्याच्या काळात देशातील नद्यांचा उपयोग कचराकुंडीप्रमाणे केला जातोय. अनेक नद्यांमध्ये पशुवधगृहांचे रक्तमिश्रित पाणी, घराघरांमध्ये सांडपाणी आणि कारखान्यांचे रसायनयुक्त पाणी सोडले जात आहे. त्यामुळे या पवित्र नद्यांनी नाल्यांचे रुप धारण केले आहे. या दूषित पाण्यामुळ जलप्रदूषण, वायुप्रदूषण, वेगवेगळे आजार पसरत आहेत. याच पार्श्वभूमीवर एका तरूणाने या नद्या स्वच्छ करण्याचा विडा उचलला आहे. पर्यावरणप्रेमी सुरेंद्र सिंग चौधरी ऊर्फ ‘बिट्टू तबाही’ असे त्याचे नाव असून तो सध्या यमुना नदीच्या स्वच्छतेसाठी राजाधानी दिल्लीत पोहोचला आहे. यापूर्वी त्याने मध्य प्रदेशातील अजनार नदीचे रूप पालटून जागतिक स्तरावर लोकांची मने जिंकली होती.
इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, बिट्टूने ‘वर्ल्ड क्लिनअप डे’च्या निमित्ताने 20 सप्टेंबरपासून यमुनेच्या पात्रात स्वच्छता अभियान सुरू केले आहे. या मोहिमेसंदर्भातील एक व्हिडीओ बिट्टीने सोशल मीडियावर शेअर केला असून या मोहिमेची सविस्तर माहिती दिली आहे. त्यांच्या या जिद्दीने पुन्हा एकदा देशभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. या विशेष मोहिमेच्या पहिल्या दिवशी बिट्टू तबाही आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अवघ्या साडेचार तासांच्या प्रयत्नांनंतर यमुनेच्या किनाऱ्यावरून तब्बल 585 किलो कचरा बाहेर काढला. या स्वच्छता मोहिमेदरम्यान नदीकाठच्या परिसरातील स्थानिक नागरिकांनीही बिट्टूला सहकार्य केले.
&
View this post on Instagram
nbsp;
यमुनेच्या घाटावर मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक, पूजेचे साहित्य, निर्माल्य, हार आणि इतर टाकाऊ वस्तू पसरल्या होत्या. या सर्व कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करत संपूर्ण परिसर स्वच्छ करण्यात आला. हा थरारक आणि प्रेरणादायी अनुभव बिट्टू यांनी आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केला असून, त्यांच्या या व्हिडिओला सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
बिट्टू यांच्या या महत्त्वपूर्ण मोहिमेला ‘फिलिप मॉरिस’ (Philip Morris) संस्थेचे मोठे सहकार्य लाभले आहे. याआधी त्यांच्या अजनार नदीवरील कार्याची दखल घेत डच पर्यावरण संस्था ‘द ओशियन क्लिनअप’चे संस्थापक बोयान स्लेट यांनी त्यांना कामाची ऑफर दिली होती, तर उद्योगपती आनंद महिंद्रा यांनीही त्यांच्या कामाचे सोशल मीडियावर कौतुक केले होते.
यमुना नदीची ही स्वच्छता मोहीम सलग तीन दिवस चालणार असून, दिल्लीनंतर गुरुग्राममधील खेडकी दौला हा त्यांचापुढील थांबा असणार आहे. एक तरुण आपल्या प्रामाणिक प्रयत्नांनी देशातील प्रदूषित जलस्रोतांना पुनरुज्जीवित करू शकतो, हेच बिट्टू तबाही यांनी आपल्या कृतीतून पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवले आहे.


























































