
माटुंगा- किंग्ज सर्कल येथील जीएसबी सेवा मंडळाच्या श्री गणेशमूर्तीचा ‘मुंबईतील सर्वात श्रीमंत गणपती’ म्हणून गौरव करण्यात आला आहे. मंडळाच्या या ऐतिहासिक कामगिरीची ‘विनर्स बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस्’मध्ये नोंद करण्यात आली असून मंडळाला जागतिक विक्रमाचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
गौड सारस्वत ब्राह्मण (जीएसबी) सेवा मंडळाने तब्बल 703.27 कोटींचे विमा संरक्षण घेतले आहे. या विमा संरक्षणामध्ये श्री गणेशमूर्तीवरील मौल्यवान दागिने, मंडप, स्वयंसेवक, पुजारी तसेच गणेशोत्सवाला भेट देणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेचा समावेश असल्याचे प्रमाणपत्रातील माहितीत नमूद करण्यात आले आहे. विनर्स बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस्चे अध्यक्ष डॉ. दीपक हारके, उपाध्यक्ष दर्शन पाई वर्नेकर यांच्या हस्ते मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना जागतिक विक्रमाचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.




























































